किवळे येथील बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर करा – लक्ष्मण जगताप

0
535

पिंपरी,दि.१९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत किवळे येथील मुकाई चौकात सात वर्षांपूर्वी पीएमपीएमएलसाठी सुसज्ज बीआरटीस बस टर्मिनल उभारण्यात आले आहे. महापालिकेने लाखो खर्च करून उभारलेल्या या बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही. या बीआरटीएस बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यात यावा, अशी सूचना चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालकांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या बस टर्मिनलच्या आसपास दाट लोकसंख्येच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पीएमपीएमएलला दरवर्षी कोट्यवधी देऊनही आणि बस मार्गांवर सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही आमच्या शहरातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असेल, तर हे पीएमपीएमएलचे अपयश आहे. आमचे पैसे घेता, तर या शहरातील नागरिकांना चांगली प्रवासी सुविधा द्या आणि किवळे येथील मुकाई चौकातील बीआरटीएस बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यात यावा.

औंधला लागून असलेल्या सांगवी फाटापासून ते किवळे या मुख्य बीआरटीएस रस्त्याच्या शेवटच्या टोकाला हे बीआरटीएस बस टर्मिनल उभारण्यात आले आहे. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च केले आहेत. पण गेल्या सात वर्षात या बस टर्मिनलचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचे दिसत आहे. हे पीएमपीएमएल प्रशासनाचे पूर्णपणे अपयश आहे.किवळे, मुकाई चौक येथून पुणे मनपा भवन आणि निगडी या दोनच मार्गावर बस उपलब्ध आहेत. मुकाई चौकापासून चौफेर असलेल्या रावेत, किवळे, मामुर्डी, साईनगर, दत्तनगर, उत्तमनगर, भीमाशंकरनगर इत्यादी दाट वस्तीच्या भागातील नागरिकांसाठी पीएमपीएमएल प्रशासन फिडर रुटसुद्धा सुरू करू शकलेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांची सार्वजनिक प्रवासासाठी प्रचंड गैरसोय आहेत. खासगी वाहने आणि रिक्षाने प्रवास करून या नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

किवळे, मुकाई चौक येथील बीआरटीएस बस टर्मिनलचा तातडीने पूर्ण क्षमतेने वापर करण्यास सुरूवात करावी. किवळे ते पुणे विमानतळ, किवळे ते स्वारगेट, देहूरोड ते हिंजवडी फेज-३, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी, देहूरोड ते पिंपरीगाव या मार्गावर बस पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.”