“करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग!” – प्रा. विजय नवले

0
344

पिंपरी,दि.२८(पीसीबी ) “करिअर हा समृद्ध जीवन जगण्याचा यशस्वी मार्ग आहे. कर्तबगारीमुळे चेहऱ्यावर फुलणारे समाधान हे उत्तम करिअरचे लक्षण होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ करिअर समुपदेशक प्रा. विजय नवले यांनी आचार्य अत्रे सभागृह, संततुकारामनगर, पिंपरी येथे सोमवार, दिनांक २७ जून २०२२ रोजी केले.

मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशन आयोजित ‘निवड करिअरची… दिशा यशाची…’ या विनाशुल्क उपक्रमांतर्गत प्रा. विजय नवले यांनी भारतीय जैन संघटना संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या इयत्ता नववी ते बारावीचे विद्यार्थी आणि पालक यांना मार्गदर्शन केले. मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशनच्या प्रमुख नूतन बनकर, प्रशासक गौरी ढोले-पाटील, प्राचार्य दिलीप देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्रा. अनुजा गडगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थिनींनी सादर केलेली गणेश नृत्यवंदना, दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नूतन बनकर यांनी प्रास्ताविकातून, “चौतीस वर्षांनंतर अभ्यासक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या मनांत भावी काळासाठी करिअर निवडताना गोंधळ निर्माण होतो. त्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे!” अशी भूमिका मांडली. गौरी ढोले-पाटील यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अन् परदेशातही एकूण अडीच हजार सदस्य असलेल्या मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशनच्या गृहिणी, सांस्कृतिक, आरोग्य, शिक्षण, सामाजिक दायित्व आणि नोकरी मार्गदर्शन अशा विविध विभागांच्या सुमारे तीन वर्षे कालावधीतील उपक्रमांची माहिती दिली. दिलीप देशमुख यांनी आपल्या मनोगतातून १९९३ सालच्या किल्लारी भूकंपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लातूर येथून विद्यार्थ्यांचे पिंपरी येथील वसतिगृहात पुनर्वसन करून त्यांच्यासाठी भारतीय जैन संघटनेने स्थापन केलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची पार्श्वभूमी कथन केली. प्रा. विजय नवले पुढे म्हणाले की, “करिअरमध्ये आपल्या आवडीचे क्षेत्र मिळाले तर काम करण्यात खूप आनंद मिळतो. प्रत्येक विद्यार्थ्याला आपले आवडते क्षेत्र निवडण्याचा अधिकार आहे; परंतु त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते.

आईवडिलांना आपल्या पाल्याचा कल लहानपणापासून लक्षात येतो. त्यामुळे किमान आठव्या इयत्तेपासून शैक्षणिक कारकिर्द घडवायला सुरुवात करावी. क्रीडापटू, वैज्ञानिक, कलावंत यांसारख्या अलौकिक कार्यक्षेत्रात कारकिर्द घडवायची असल्यास वयाच्या पाचव्या वर्षांपासून विशेष प्रयत्न करणे गरजेचे असते. केवळ संपत्ती आणि भौतिक सुबत्ता म्हणजे उत्तम करिअर नव्हे; तर आधी मुलांना उत्तुंग, भव्य स्वप्न पाहू द्या अन् त्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रयत्नशील बनवा. आज भारत जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भविष्यात तो सर्वाधिक आनंदी, यशस्वी, समाधानी नागरिकांचा देश म्हणून ओळखला जावा, यासाठी आतापासूनच प्रयत्न केले पाहिजेत. अभ्यासातून करिअर अन् कौशल्यातून करिअर असे दोन मार्ग आहेत; तसेच पैशासाठी करिअर आणि आवडीचे करिअर असेही दोन मार्ग आहेत.

त्यामुळे करिअर निवडताना आपली मूलभूत क्षमता, आवड, उपलब्ध संधी, कारकिर्दीचा कालावधी, त्यासाठी द्यावे लागणारे मानसिक, शारीरिक, आर्थिक योगदान या गोष्टींचा सर्वांगीण विचार आधीच करायला हवा. लघू उद्योजक, संशोधक, सर्जनशील कलावंत या करिअरच्या वाटा तरुणाईला साद घालीत आहेत. पैसाकेंद्रितपेक्षा कर्तृत्वकेंद्रित करिअर महत्त्वाचे असते. तरुणाईच्या अमूल्य योगदानातून ज्यावेळी आपला एक रुपया म्हणजे पन्नास अमेरिकन डॉलर अशी आर्थिक परिस्थिती निर्माण होईल; त्यावेळी भारत खऱ्या अर्थाने उद्यमशील तरुणांचा देश बनेल!” शिवाजीमहाराज, सी. डी. देशमुख, प्र. के. अत्रे, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर असे संदर्भ उद्धृत करीत प्रा. विजय नवले यांनी आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैलीने भरगच्च सभागृहाला मंत्रमुग्ध केले. प्रा. नीता रासकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. किरण मासाळकर यांनी आभार मानले. ‘वंदेमातरम’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.