महापालिका वैद्यकीय विभागातील पदांसाठीची परीक्षा सुरळीत

0
187

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या विविध पदांसाठी कायमस्वरुपी भरतीसाठी राज्यातील 13 शहरांतील 47 केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.

या ऑनलाइन परीक्षेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. महापालिकेत वैद्यकीय विभागातंर्गत 128 पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी तब्बल 19 हजार 56 जणांनी अर्ज केला आहे. वैद्यकीय विभागाच्या विविध पदांसाठी झालेल्या परीक्षेला प्रत्येक केंद्रावर 1 अधिकारी आणि 2 पर्यवेक्षक नियुक्त केले होते. पुणे शहरात या परीक्षेसाठी 11 केंद्र होते.

महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा आकृतीबंध नव्याने तयार केला आहे. पर्यायाने, अनेक नवीन पदे निर्माण झाली आहेत. तसेच, दर महिन्यास किमान 50 ते 100 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर निवृत्त होत आहेत. पर्यायाने मनुष्यबळ कमी होत आहे. तर दुसरीकडे दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिकेवर ताण येत आहे. तसेच महापालिकेची भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. एप्रिल महिन्यामध्ये राज्य शासनाने सर्व महापालिकांना नोकरभरती करण्यात परवानगी दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये पहिल्या टप्प्यात वैद्यकीय विभागाच्या पदांची भरती करण्यात येत आहे.