ऑलिंपिक संयोजनाबाबत संयम बाळगा

0
214

ल्युसाने, दि. 28 (पीसीबी) – करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमुळे जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले असून, त्याचे पडसाद ऑलिंपिकच्या संयोजनावर उमटू लागले आहेत. एकीकडे आयोजनाला विरोध होत असताना जपान सरकार ऑलिंपिक घेण्यावर ठाम आहे. त्याचवेळी इतके दिवस खात्री बाळगणारे ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅश यांनी देखिल आता घाई कशाला करताय, संयम बाळगा असे म्हटले आहे. करोनाच्या संसर्गामुळे गेल्यावर्षी सर्व प्रथम ऑलिंपिक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या वेळी जपान सरकार, संयोजन समिती आणि आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या नव्या तारखा निश्चित केल्या होत्या.

गेल्या काही दिवसात येथील प्रसारमाध्यमांनी ऑलिंपिकच्या संयोजनाविषयी नकारघंटा वाजवण्यास सुरवात केली आहे. ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष बॅश केव्हाही तातडीची बैठक बोलावून या विषयी निर्णय घेतील असेही प्रसिद्ध होत आहे. प्रत्यक्षात बॅश यांची भूमिका कमालीची सकारात्मक दिसून आली. स्पर्धेबाबत पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर आमचा विश्वास नाही आणि त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. सध्या स्पर्धा कशा पार पाडल्या जातील याचा आम्ही विचार करत आहोत. स्पर्धा घेण्यावर आमचा भर आहे, स्पर्धा रद्द करण्यावर नाही, असे बॅश यांनी स्पष्ट केले.

जपानमधील परिस्थिती गंभीर होत आहे हे खरे असले, तरी लगेच निर्णयापर्यंत येऊ नका. जरा धीर धरा, संयम बाळगा असे बॅश यांनी सांगितले. आम्हाला जर स्पर्धा घेणे खरंच सुरक्षित वाटले नाही, तर आम्ही त्या घेणारही नाहीत. याबाबत आताच बोलणे योग्य नाही. संयम बाळगा, असे बॅश वारंवार सांगत होते. बॅश यांनी या वेळी टोकियो स्पर्धेचे पहिले प्ले-बुक चेही प्रकाशन केले.

संयोजक प्रेक्षकांशिवाय स्पर्धा घेण्यास सज्ज आहेत. पण, जपानची टेबल टेनिसपटू म्हणते, प्रेक्षकांशिवायएक वेळ स्पर्धा होऊ शकते, पण खेळाडूच आले नाहीत, तर काय करणार. त्याचबरोबर जपानची जिम्नॅस्टिक स्टार कोहेई उचिमुरा म्हणतो, स्पर्धा व्हावी असे खेळाडू आणि प्रेक्षकांना वाटायला हवे. त्यांना जर तसे वाचत नसेल, तर स्पर्धा होणार नाही.