एक वर्षांनी भारतीय हॉकी संघ पुन्हा प्रमुख स्पर्धेसाठी मैदानावर

0
387

ब्युनोस आयर्स, दि.१० (पीसीबी) : तब्बल एका वर्षानंतर भारतीय हॉकी संघ एखाद्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरणार आहे. उद्यापासून अर्जेंटिनात सुरू होणाऱ्या एफआयएच प्रो लीगमध्ये भारतीय संघ ऑलिंपिक चॅंपियन अर्जेंटिनाशी दोन हात करेल. दोन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना उद्या होणार आहे.

करोनाच्या संकटकाळामुळे गेले वर्ष बंगळूर येथील साईच्या केंद्रावरच भारतीय संघाचा मुक्काम होता. त्यानंतर आता कुठे भारतीय संघाला एखाद्या मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. या लीगमधील अखेरची लढत भारत गेल्या वर्षी फेब्रुवारीत भुवनेश्वर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळे होते.

प्रो लीगच्या गुणतक्त्यात भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर आहो. त्यांचे सहा सामन्यातून प्रत्येकी दोन विजय, पराभव आणि अनिर्णीत सामन्यासह १० गुण झाले आहेत. जगज्जेते बेल्जियम १३ सामन्यातून ३२ गुणांसह आघाडीवर आहेत. जर्मनीचे ८ सामन्यातून १९, तर नेदरलॅंडसचे ११ सामन्यातून १८ गुण झाले आहेत. ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचे ८ सामन्यातून १४ गुण झाले असून, ते चौथ्या स्थानावर आहेत. अर्जेंटिना ऑलिंपिक चॅंपियन असले, तरी प्रो लीगमध्ये ते भारतानंतर सहाव्या स्थानावर आहेत.

गेले वर्षभर भरपूर सराव झाला. पण, सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. आता सामने खेळायला मिळणार आहे. ऑलिंपिक स्पर्धा तोंडावर असताना या संधीचा फायदा खेळाडूंनी घ्यायला हवा. अर्जेंटिनासारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध खेळताना आम्हालाही आमच्या क्षमतेची कल्पना येईल.
मनप्रित सिंग, भारताचा कर्णधार

ऑलिंपिकसाठी आता केवळ तीन महिने असल्यामुळे सरावासाठी प्रो लीगसारखी चांगली संधी कुठल्याच संघाला नसेल. भारतीय संघही तुल्यबळ संघांशी दोन हात करून महत्वपूर्ण मॅच प्रक्टिस करून घेईल. करोनाच्या संकटकाळानंतर भारताने फेब्रुवारीतच मैदानावर पुन्हा पाऊल टाकले. त्या वेळी त्यंनी युरोपमध्ये अनुभव घेतला. या दौऱ्यात त्यांनी जर्मनी आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध झालेल्या लढतीत दोन विजय मिळविले, तर त्यांचे दोन रामने अनिर्णीत राहिले. ऑलिंपिक तयारीसाठी या सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, भारतीय संघाचा खरा कस या लीगमध्येच लागणार आहे. ऑलिंपिकपूर्वी आपण कोठे आहोत याची कल्पना त्यांना या स्पर्धेतूनच मिळणार आहे. या वेळी ऑलिंपिक चॅंपियन अर्जेंटिना त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. स्पर्धापूर्व सराव सामन्यात एक विजय मिळवून भारतीय संघाने आपली तयारी चांगली असल्याचे दाखवून दिले आहे.

मोठी विश्रांती झाल्यानंतरही कर्णधार मनप्रित सिंग, वरुण कुमार आणि रुपिंदरपाल सिंग हे चांगल्या फॉर्ममध्ये दिसल्याने भारतीय संघाला दिलासा मिळाला असेल. यातही मनदीप सिंग, निलकांत शर्मा आणि दिलप्रीत सिंग या तीन आक्रमकांनी सराव सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी निर्माण करुन आपला प्रभाव पाडला आहे. सराव सामन्यातील कामगिरीवर कर्णधार मनप्रित समाधानी आहे. दोन्ही सामन्यात चांगला खेळ झाला. सामने एकतर्फी झाले नाहीत. त्यामुळे या सराव सामन्यातील खेळाचा अनुभव येथे फायद्याचा ठरेल, असे कर्णधार मनप्रितने सांगितले.

भारतीय संघाच्या कर्णधारपदी पुन्हा वर्णी लागल्यावर मनप्रीतने संघाच्या तयारीवर समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, ‘गेले वर्षभर कुणीच खेळलेले नाही. पण, तयारी चांगली केली आहे. प्रो लीगच्या पहिल्या टप्प्यात बेल्जियम नेदरलॅंड्स, ऑस्ट्रेलियासारख्या अव्वल संघांबरोबर आम्ही चांगला खेळ केला आहे. त्यानंतर केव सरावावर भर राहिला आहे. सामना खेळण्यासाठी आम्ही आता प्रथमच मैदानावर उतरणार आहोत. ऑलिंपिकपूर्वी होणारा प्रत्येक सामना आता आमच्यासाठी एक शिकवणीच असेल, असेही मनप्रितने सांगितले.