गतविजेत्या मुंबई इंडियन्सची पुन्हा सलामीला हार

0
204

चेन्नई, दि.१० (पीसीबी) : हर्षल पटेलची अचूक गोलंदाजी आणि त्याला एबी डिव्हलर्स, ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीची साथ मिळाल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने आयपीएलच्या नव्या मोसमाची विजयी सुरवात केली. त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा दोन गडी राखून पराभव केला. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा सलामीचा सामना जिंकण्यात अपयश आले.

मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर ९ बाद १५९ धावा केल्या. त्यानंतर डिव्हिलर्सच्या २७ चेंडूंतल्या ४८ धावा आणि त्यापूर्वी ग्लेन मॅक्सवेल (३९) आणि विराट कोहली (३३) यांच्या तिशीतल्या खेळीमुळे बंगळूरला आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले. त्यांनी २० षटकांत ८ बाद १६० धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना बंगळूरने वॉशिंग्टन सुंदर आणि विराट कोहली अशी नवी सलामीची जोडी उतरवली. कोहलीला सुरवातीलाच लय गवसली. सुंदर तशी सुरवात करू शकला नाही. पदार्पणाची संधी रज पडियारने दवडली. अशा वेळी कोहली आणि मॅक्सवेल यांच्या भागीदारीने बंगळूरचे आव्हान राखले. मात्र, बुमरा आणि यान्सेन यांच्या मधल्या टप्प्यातील दोन षटकांनी बंगळूरला अडचणीत आणले. त्यांनी कोहली आणि मॅक्सवेलच्या विकेट मिळविल्या. अर्थात, खेळपट्टीवर डिव्हिलर्स असल्याचा फायदा बंगळूरला झाला. त्याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र, शिक्कामोर्तब करण्यास तो थांबूल शकला नाही. धाव चोरण्याच्या नादात तो धावबाद झाला. त्या वेळी दोन चेंडूंत दोन धावा हे किरकोळ आव्हान महंमद सिराज आणि हर्षल पटेल यांनी पार केले.
आक्रमक फटका मारताना एबी डिव्हलर्स.

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर मुंबई संघाला चांगली सुरवात मिळाली नाही. ख्रिस लीन अडखळत फलंदाजी करत होता, तर रोहित शर्मा धाव चोरण्याच्या नादात धावबाद झाला. लीनने स्थिरावण्यासाठी जरूर काही षटके घेतली पण, त्यानंतर आपली आक्रमकता दाखवण्यास सुरवात केली. सूर्यकुमार यादवही त्याला तशीच आक्रमक साथ देत होता. दोघांनी झटपट ७० धावा जोडल्या. पण, सूर्यकुमार आणि लीन दोघांनाही त्यांच्या आक्रमक सुरवातीचा फायदा उठवता आला नाही. लीन (४९) अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यात गोलंदाजीला आलेल्या हर्षल पटेलने धोकादायक वाटणारी मुंबई इंडियन्सची मधली फळी गुंडाळली. हार्दिक पंड्या, किएरॉन पोलार्ड आणि कृणाल पंड्या त्याची शिकार झाले.

नवदीप सैनीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या हर्षदने आपली निवड सार्थ ठरवली. स्लोअर वनचा सुरेख वापर करून त्याने नव्या मोसमाच्या सुरवातीला पहिल्याच सामन्यात पाच गडी बाद करण्याची कामगिरी केली. विशेष म्हणजे मुंबईविरुद्ध अशी कामगिरी प्रथमच एखाद्या गोलंदाजाने केली. अखेरच्या षटकांत त्याने मिळालेली आपली षटके अचूक टाकली. दडपणाखाली मुंबईचे फलंदाजही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अखेरच्या चार षटकांत त्यांना केवळ २४ धावांच करता आल्या. त्यामुळे त्यांचे आव्हान मर्यादित राहिले.

संक्षिप्त धावफलक –
मुंबई इंडियन्स २० षटकांत ९ बाद १५९ (ख्रिस लीन ४९ (३५), सूर्यकुमार यादव ३१ (२३), ईशान किशन २८ (१९), हर्षल पटेल ५-२७) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर २० षटकांत ८ बाद १६० (एबी डिव्हिलर्स ४८ (२७), ग्लेन मॅक्सवेल ३९ (२८), विराट कोहली (३३), जसप्रित बुमरा २-२६, मार्को यान्सेन २-२८)