उमेदवाराच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावरुन प्रचार केल्यास कारवाई होणार

0
596

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली असून आज (सोमवार) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेर दिवस आहे. त्यामुळे उद्यापासून प्रचाराचे वातावरण तापण्यास सुरूवात होणार आहे. सर्व उमेदवारांनी प्रचार यंत्रणा सज्ज ठेवली असून सोशल मीडियावर सर्वांची भिस्त असणार आहे. परंतु उमेदवाराच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावरुन अन्य कोणी प्रचार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.  

उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करताना नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अधिकृत खात्यावरुनच प्रचार करावा. मल्टिपल खात्यांवरुन प्रचार करण्यात येऊ नये. तसेच उमेदवाराच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावरुन अन्य कोणी प्रचार केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा  देण्यात आला आहे.

सोशल मीडियाचा वापर करताना उमेदवार तसेच त्यांच्या प्रतिनिधींनी अन्य दुसऱ्या उमेदवाराबाबत चुकीची पोस्ट करणे किंवा एका उमदेवाराने मल्टिपल खात्यावरुन पोस्ट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या खात्यावरुनच प्रचार होत असल्याची  शहानिशा करावी.  उमेदवाराच्या नावाने इतर कोणी खाते सुरू करुन प्रचार करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणुकीत प्रचार साधने  वापरताना  प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.