इम्रान खान अतिरेक्यांच्या हातचे बाहुले- मोहम्मद कैफ

0
782

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. इम्रान खान हे एक दिग्गज क्रिकेटपटू होते, मात्र आता ते पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत, अशा शब्दात कैफ याने इम्रान खान यांचा उल्लेख केला आहे. पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे सांगत कैफ याने इम्रान खान यांच्या भाषणाचीही खिल्ली उडवली. इम्रान खान यांचे एक भाषण ट्विट करत कैफ याने इम्रान खान यांना चांगलेच सुनावले आहे.

इम्रान खान यांना उद्देशून कैफ म्हणतो, ‘ होय, तुमचा देश पाकिस्तानला दहशतवादाशी बरेच काही घेणे-देणे आहे. पाकिस्तान हा दहशवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. संयुक्त राष्ट्रांमधील आपले भाषण अत्यंत दुर्दैवी होते. एक महान क्रिकेटपटू लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले बनले आहे.’

संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीच्या ७४ व्या सत्रात इम्रान खान यांचे भाषण झाले. या भाषणावर जगभरातून टीका झाली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली यानेही इम्रान खान यांच्या संयुक्त राष्ट्रांतील भाषणावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. हे भाषण म्हणजे निव्वळ बडबड असल्याचे गांगुलीने म्हटले होते. ‘ज्याला संपूर्ण जग ओळखते, तो हा क्रिकेटपटू नाही’, असा शब्दांत गांगुलीने इम्रान खान यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.