उत्तरप्रदेश पोलिसांचा प्रताप: संशयित समजून अॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजरलाच घातली गोळी; मॅनेजरचा मृत्यू

0
567

लखनौ, दि. २९ (पीसीबी) –  यूपीची राजधानी लखनौमधील गोमतीनगर परिसरात पोलिसांनी संशयित आरोपी समजून अॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजरलाच गोळी घातल्याचे समोर आले आहे. या घटनेत शुक्रवारी (दि.२८) रात्री बाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विवेक तिवारी (रा. सुलतानपूर) असे गोळीबारात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री गोमतीनगर परिसरात एक कार उभी असताना समोरुन दोन पोलीस कर्मचारी येत होते. पोलिसांना पाहताच ही कार निघून जात होती. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला तेवढ्यातच गोळी चालल्याचा आवाज आला. अचानक गाडी एका खांबावर आदळली. विवेक त्यानंतर रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले, पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू गोळी लागल्याने झाला की गाडी खांबावर आदळल्याने याचा तपास सुरु आहे, अशी माहिती लखनौचे एसएसपी कलानिधी नैथानी यांनी दिली.

दरम्यान, विवेक अॅपल कंपनीच्या एरिया मॅनेजर या पदावर काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. विवेकच्या महिला सहकाऱ्याला मीडियाशी बोलू नये यासाठी पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी मारल्याची घटनेची ही महिला सहकारी प्रत्यक्षदर्शी आहे. तिला पोलिसांनी गोमतीनगरमधील तिच्या घरीच नजरकैदेत ठेवले आहे, जेणेकरुन तिला मीडियाशी बोलता येणार नाही. गोळीबाराची घटना घडली तेव्हा ती विवेकसोबत कारमध्ये होती.