ईडीने २२५ कोटींची ‘या’ आमदाराची संपत्ती केली जप्त

0
252

मुंबई, दि. २४ (पीसीबी) – राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार साखरसम्राट रत्नाकर गुट्टे यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीने रत्नाकर गुट्टे यांची २५५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ६३५ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.

ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करत गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड, योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडमधील संपत्तीवर कारवाई केली आहे. शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेड रत्नाकर गुट्टे यांच्या मालकीची आहे. ते कंपनीचे संचालकही आहेत.

रत्नाकर गुट्टे इतरांच्या मदतीने गरीब शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या कृषी कर्ज योजनेचा गैरफायदा घेतल्याचा ईडीचा आरोप आहे. या कर्ज योजनेअंतर्गत बँका ऊस शेतकऱ्यांना (जमिनीच्या आधारे) पीकांसाठी महत्वाच्या गोष्टी उदाहरणार्थ बियाणं, खतं, ट्रॅक्टर, पंप आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी पैसा देतं.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, पीक खरेदी करताना रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांची माहिती घेत एक डेटा बँक तयार केला. यानंतर गंगाखेड साखर कारखाना शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज मिळवण्याच्या उद्देशाने काही बँकांशी जोडला गेला. थोडक्यात बँकांसाठी ते एजंट झाले आणि शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

ईडीने सांगितलं आहे की, तपासात गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या उपलब्ध माहितीचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे कर्ज घेतलं. बँकांनी २०१२-१३ ते २०१६-१७ दरम्यान जवळपास ७७२ कोटींचं कर्ज मंजूर केलं आणि ६३२ कोटींची वाटप केलं. हे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत. दुसरीकडे गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून मिळालेल्या स्वाक्षरीचा फायदा घेत हे पैसे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये टाकले. कंपनीने हा पैसे जमीन तसंच शेअर्स खरेदी करण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी वापरले.

या बँक घोटाळ्यावरुन ईडीने कारवाई केली असून २५५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये गंगाखेड साखर कारखान्यातील २४७ कोटींचा शुगर प्लांट आणि मशीनरी आहे. तीन कंपन्यांची पाच कोटींची जमीन आहे. १.५८ कोटींचा बँक बॅलेन्स तसंच १.९१ कोटींचे शेअर्स आहेत.