यंदा आयपीएलसाठी लिलाव नाही ?

0
175

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या असला, तरी त्यापूर्वीच एक बातमी आलीये, ती म्हणजे या वेळी होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या मोसमासाठी गाजावाजा करत होणारा लिलाव रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआय या वेळी अगदी साधेपणाने छोट्या स्वरुपात लिलाव प्रक्रिया पूर्ण करणार आहे. एकाच वेळे अनेक खेळाडूंचा लिलाव करण्याची कल्पना बीसीसीआय या वेळी बाजूला ठेवणार आहे. आयपीएलसाठी खेळाडूंचा पूर्ण क्षमतेचा लिलाव हा आता २०२२च्या मोसमासाठीच केला जाईल, असे समजते. या वेळी होणाऱ्या १४ व्या मोसमासाठी बीसीसीआय खेळाडूंचा छोटेखानी लिलाव फेब्रुवारीच्या मध्यात आयोजित करणार आहे.

कुणाला फायदा कुणाला तोटा
बीसीसीआयच्या या छोटेखानी लिलाव घेण्याच्या निर्णयाचा कुणाला फायदा, तर कुणाला तोटा होऊ शकतो. मुंबई इंडियन्स सारखी आणखी एखादा संघ असा असू शकतो, की त्याला आपल्या संघात फारसे बदल करायचे नाहीत. पण, तेराव्या आपयीएलमध्ये सपशेल अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्जला जर आपला संपूर्ण संघच बदलायचा असेल, तर त्यांच्यासाठी या निर्णयाचा तोटा होईल.

अर्थात, ही बाहेर आलेली बातमी असून, या वर आज होणाऱ्या वार्षिक बैठकीतच शिक्कमोर्तब अपेक्षित आहे. या वेळी आयपीएलमध्ये दोन नव्या संघांना जोडून घेण्याचा विचार जसा मागे पडू लागला, तसा लिलावाचा मुद्दा देखील बाजूला राहणार याचे संकेत मिळत होते. आयपीएलच्या या मोसमात प्रायोजक, प्रसारण असे सगळ्यांचेच करार संपणार आहेत. त्यामुळे २०२२च्या मोसमापासून सगळेच कसे नवे असे मानून खेळाडूंचा पूर्ण क्षमतेचा लिलाव देखील त्याच वेळी घेण्याचा आणखी एक विचार समोर आला.

आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पूर्ण क्षमतेने घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही आणि करोनाचे संकट, तसेच बंधने अजून संपलेली नाहीत. त्यामुळेच मोठ्या स्वरुपाच्या लिलावाचा मुद्दा बाजूला पडला. छोट्या स्वरुपात लिलाव घेतल्यावर फ्रॅंचाईजींना देखील काही नव्या खेळाडूंवर बोली लावता येऊ शकेल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या छोटेखानी लिलावाची तारिख आणि केंद्र नंतर जाहिर केले जाणार आहे. देशांतर्गत मोसमातील सईद मुश्ताक अली टी २० करंडक स्पर्धा जानेवारी महिन्याच्या अखेरीस संपणार आहे. या स्पर्धेतून नव्या खेळाडूंचा शोध होऊ शकतो. म्हणून आयपीएलचा लिलाव फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतो.