त्या पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विमानतळावरूनच पोबारा, देशभर खळबळ

0
262

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) – कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानं ब्रिटनमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकाराचा संक्रमण वेग जास्त असल्यानं इतर देशांनीही ब्रिटनहून येणारी विमान थांबवली आहेत. भारतात बुधवारपासून (२३ डिसेंबर) ब्रिटनमधून येणारी विमान बंद केली असून, त्यापूर्वी आलेल्या प्रवाशांपैकी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी विमानतळावरूनच पोबारा केला. दिल्ली विमानतळावर ही घटना घडली.

ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या प्रवाशांना आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. असं असलं तरी ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या पाच प्रवाशांनी विमानतळावर उतरल्यानंतर अधिकाऱ्यांना चकमा देत पळ काढला.
ही घटना समोर आल्यानंतर प्रशासनानं तातडीने त्यांचा शोध सुरू केला. त्यातील तीन जणांना शोधण्यात प्रशासनाला यश आलं. रात्रीच त्यांना दिल्लीतील लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसरीकडे एक कोरोनाबाधित लुधियाना तर दुसरा आंध्र प्रदेशात जाण्यात यशस्वी ठरला. त्यांनाही बुधवारी अधिकाऱ्यांनी परत आणलं आहे. पाचही जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

पाच पैकी एकजण अमृतसर येथील पंडोरी गावातील ४६ वर्षीय व्यक्तीचा मुलगा असून, तो ब्रिटनहून परत आला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतरही तो दिल्ली विमानतळावरून लुधियानापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला. लुधियानात पोहोचल्यानंतर तो खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. बुधवारी सकाळी त्याला पुन्हा दिल्लीला पाठवण्यात आलं.
पंजाबच्या अधिकाऱ्यांना याविषयी दिल्लीतून माहिती देण्यात आली. त्यानंतर स्थानिक प्रशासनानं त्या प्रवाशाचा शोध सुरू केला. त्यानंतर एका खासगी रुग्णालयात तो प्रवाशी अधिकाऱ्यांना सापडला. स्थानिक प्रशासनाने त्याला दिल्लीला पाठवले. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनाही क्वारंटाइन केलं.