आमदार लक्ष्मण जगताप यांची मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी

0
649

– प्रकृती ठणठणीत झाल्याने कार्यालयीन कामकाज सुरू

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये अजित पवार यांची निर्विवाद सत्ता खाली खेचून भाजपाची सत्ता आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता त्या आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव आता राज्याच्या पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारासाठी आघाडीवर असल्याचे वृत्त आहे. प्रकृती स्वास्थ ठिक नसल्याने दोन-तीन महिने रुग्णालयात उपचार घेणारे आमदार जगताप आता एकदम तंदुरुस्त असून त्यांनी आपले दैनंदिन कार्यालयीन कामकाज सुरू केले आहे. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका विचारात घेऊन भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव संभाव्य मंत्री म्हणून आघाडीवर होते, पण आता आमदार जगताप स्पर्धेत आल्याने त्यांना ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रात दीड महिन्यांपूर्वी शिवसेनेची सत्ता गेली. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सर्व घडामोडींचे मुख्य सुत्रधार भाजपाचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. बंडखोर आमदारांना अपात्रतेची चिंता असल्याने तब्बल ४० दिवस मंत्रीमंडळ होऊ शकले नाही. विरोधकांनी टीकेची झोड उठविल्यावर भाजपाचे ९ आणि शिंदे गटाचे ९ अशा १८ मंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. मंत्रीमंडळात भोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांचा समावेश जवळपास निश्चित समजला जात होता. अगदी सुरवातीपासून त्यांचेच नाव संभाव्य मंत्री म्हणून माध्यमांतून येत होते. प्रत्यक्षात विस्तार झाला त्यात आमदार लांडगे यांचे नाव नसल्याने पावसाळी अधिवेशन संपल्यावर होणाऱ्या दुसऱ्या विस्तारात समावेश होणार असल्याची चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांची लांडगे यांच्यावर विशेष मर्जी असल्याने त्यांना किमान राज्यमंत्रीपद मिळेल अशी अटकळ होती.

आमदार जगताप यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती त्यावेळी फडणवीस आणि गिरीश महाजन या दोन वरिष्ठ नेत्यांनी दोन वेळा रुग्णालयात जाऊन आमदार जगताप यांची विचारपूस केली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी वारंवार जगताप यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अमरिकेतून विशेष इंजेक्शन मागविण्यासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि नितीन गडकरी यांनीही प्रयत्न केले. बाणेर येथील जुपिटर हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर्स आणि सर्व जगताप हितचिंतकांच्या प्रयत्नांती आमदार जगताप आता एकदम ठणठणीत बरे झाले आहेत. आपल्या कार्यालयात येऊन दैनंदिन कामकाज पाहणे, महत्वाच्या फायलींवर स्वाक्षरी करणे, संस्था व संघटनांबाबत विचारपूस करणे आदी उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांच्या समर्थकांनी फोटोसह फेसबूक पोस्ट शेअर केल्याने सर्व जगताप समर्थकांना हायसे वाटले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी हर घर तिरंगा मोहिमेसाठी राष्ट्रध्वज हाती घेतलेला आमदार जगताप यांचा फोटो मीडियात व्हायरल झाला आहे. इतकेच नाही तर आता होणारी महापालिका निवडणूक, २०२४ मध्ये मावळ लोकसभा आणि नंतरच्या चिंचवड, पिंपरी विधानसभेसाठीची व्युहरचना सुध्दा आमदार जगताप यांनी सुरू केली आहे. मावळ लोकसभेत उमेदवारी करून ही शिवसेनेची जागा भाजपाला जिंकून द्यायचीच असा वज्रनिर्धार त्यांनी केला आहे. महापालिका निवडणुकित पुन्हा भाजपाची सत्ता आणायची म्हणून संभाव्य उमेदवारांची चाचपणीसुध्दा त्यांनी सुरू केली आहे. या सर्व कामांसाठी आजवरच्या कामाचा विचार करुन पुढच्या मंत्रीमंडळ विस्तारात आमदार जगताप यांच्या नावाचा समावेश व्हावा यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोर्चेबांधणी सुरू आहे.

आमदार जगताप यांची प्रकृती चिंताजनक असताना दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावरही त्यांनी भाजपासाठी मोलाचे काम केले याची जाणीव पक्षाला आहे. विधान परिषद निवडणूक हा भाजपासाठी मोठा प्रतिष्ठेचा विषय होता. त्यावेळी कार्डेक एम्बुलन्स करुन डॉक्टरांच पेथक घेऊन पीपीई किट घालून आमदार जगताप मतदानासाठी हजर होते. स्वतः फडणवीस, महाजन यांनी विधानभवनात टाळ्यांच्या गजरात त्यांची स्वागत केले आणि निकालानंतर या सर्व विजयाचे श्रेय आमदार जगताप यांना दिले होते. नंतर पुन्हा राज्यसभा निवडणुकिसाठीही आमदार जगताप यांनी जीवाची पर्वा न करता हजेरी लावली होती. भाजपासाठी प्राणाची पर्वा न करता आमदार जगताप हे मतदानाला उपस्थित राहिल्याची नोंद थेट केंद्रीय समितीनेही घेतली आहे.

आमदार जगताप यांच्या अनुपस्थितीत दुसरे आमदार महेश लांडगे हे एकटे शहरात पुन्हा भाजपाची सत्ता आणू शकतील की नाही याबाबत वरिष्ठांच्या मनात साशंकता आहे. त्यासाठी आमदार लांडगे यांना ताकद देण्यासाठी त्यांना राज्यमंत्री करायचे असेही ठरले होते. दरम्यान, आता आमदार जगताप हे पुन्हा पहिल्यासारखे सक्रीय झाल्याने आमदार लांडगे यांच्या जागेवर आमदार जगताप यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आताचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत हातातून गेलेली पिंपरी चिंचवडची सत्ता मिळवायचीच, असा निश्चय केला आहे. त्यासाठी अजित गव्हाणे यांच्यासारखा नवा अत्यंत आश्वासक चेहरा पुढे काढला आणि राष्ट्रवादीची मजबूत बांधनी सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यांना आणि पवार यांच्या आक्रमक भाषणांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याने भाजपाचे नेते सावध झाले आहेत. पवार यांना तोंड द्यायचे तर तोडीस तोड म्हणून आमदार लांडगे यांच्या एवजी आमदार जगताप यांच्या नावाला भाजपाच्या वरिष्ठांचीही पसंती आहे.

राहुल कूल, लांडगे यांची कुंबना –
मंत्रीमंडळ विस्तार करताना प्रादेशिक समतोल साधण्याची मोठी कसरत भाजपाला करावी लागत आहे. पुणे जिल्ह्यातून चंद्रकांत पाटील यांना संधी मिळाल्याने आता दुसऱ्या जेष्ठ आमदार माधुरी मिसाळ यांना संधी मिळण्याची शक्यता दुरावली आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विचारात घेऊन दौंडचे आमदार राहुल कूल आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचीही नावे सर्वात आघाडीवर होती. आता त्यात आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नावाची भर पडल्याने कुल आणि लांडगे यांची कुचंबना झाली आहे. १९८६ पासून नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर नंतर विधान परिषद सदस्य, तीन वेळी चिंचवडचे आमदार, एकदा मावळ लोकसभेची उमेदवारी असा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले आमदार जगताप यांचे पारडे मंत्रीपदासाठी जड आहे. प्रकृतीने साथ दिलीच तर २०२४ ची मावळ लोकसभा लढवायचीच असाही आमदार जगताप यांचा निर्धार आहे. त्यांची ही दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून आगामी मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचा समावेश व्हावा यासाठी त्यांच्या समर्थकांनी गाठिभेटी सुरू केल्या असल्याचे वृत्त आहे.