आमच्या समोर उत्तम विरोधी पक्ष असावा अशी अपेक्षा – संजय राऊत

0
419

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – आज राज्यातील २८८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तसेच अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्कही बजावला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज भांडुपमधील एकविरा क्रिडांगणातील मतदान केंद्रात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आज महाराष्ट्रात उत्तम मतदान होईल. आमच्यासमोर एक उत्तम विरोधीपक्ष असावा असे आम्हाला वाटते. प्रत्येक जागा ही जिंकण्यासाठी लढायची असते, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

राज्यात जर उत्तम विरोधी पक्ष असेल तर सरकारवर वचक राहतो. त्यामुळे उत्तम विरोधी पक्षासाठी मी शुभेच्छा देतो, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी धनजंय मुंडे यांच्या प्रकरणावरही भाष्य केले. प्रशांत परिचारक आणि राम कदम यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांच्यावरही करावाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्यास आदित्य ठाकरे नक्कीच मुख्यमंत्री बनतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.