आपल्या चारचाकी गाडीमध्ये सीटवरती ‘हेडरेस्ट’ का असतो? नक्की त्याचा उपयोग काय…?

0
272

आपल्या चारचाकी गाडीमधील सीट्स तर आपण पहिल्याच असतील, त्या गाड्यांमध्ये सीट्सच्या वर डोके ठेवण्यासाठी एक जागा दिलेली असते. त्याला ‘हेडरेस्ट’ असे म्हणतात. याचा वापर आपण आपल्या सोयीनुसार करू शकतो. जर ती हवी नसेल तर ही सीट आपण काढून सुद्धा ठेवू शकतो. तर या ‘हेडरेस्ट’ बद्दल असा दावा केला जातो की, हेडरेस्ट अश्यातर्हेने डिजाईन केलेले असते जेणेकरून कधी आपण गाडीमध्ये चुकून फसलो आणि गाडी पूर्णपणे लॉक झाली, तर अशावेळी आपण याचा वापर करून गाडीची काच फोडून बाहेर पडू शकतो आणि आपली सुटका करून घेऊ शकतो, असे म्हणतात. पण हा साफ खोटा दावा आहे.

तर मग या हेडरेस्टचा वापर नक्की कशासाठी केला जातो, हा प्रश्न तर आलाच कि, चला मग जाणून घेऊया याच्या वापराबद्दल…

हेडरेस्टचा हेतू असतो कि, जर चालकाने गाडीचा अर्जंट ब्रेक दाबला तर आपल्या डोक्याचे आणि मानेचे संरक्षण या हेडरेस्ट ने होऊ शकते. जर चालकाने अर्जंट ब्रेक दाबल्यानंतर प्रवाश्यांच्या मानेला हिसका लागतो आणि डोके पाठीमागे जोरात आदळते. त्यामुळे मानेला आणि डोक्याला काही दुखापत होऊ नये, यासाठी सीटच्या वर हेडरेस्ट दिले गेलेले असते.परंतु, आपल्या मानेपेक्षा आपल्या डोक्याचे वजन हे जास्त असते. त्यामुळे डोक्याला आणि मानेला संतुलित ठेवून अचानक काही घटना झाल्यास त्याच्या परिणामाने आपल्याला इजा किंवा कोणतीही दुखापत होऊ नये, म्हणून हेडरेस्ट दिलेले असते. १९२१ मध्ये हेडरेस्टच्या डिझाईनचे पहिले पेटंट अमेरीकेमधील एका शोधकर्त्याला मिळाले होते, पण काही कारणांमुळे १९६९ पर्यंत यांचा वापर केला गेला नव्हता. पण त्याचे महत्त्व आणि गरज कळल्यानंतर मात्र १९६९ नंतर गाडीमध्ये हेडरेस्ट हे बंधनकारक करण्यात आले.

कॅलिफोर्नियच्या ऑकलँडमध्ये राहणाऱ्या बेंजामीन कॅट्झ यांनी हेडरेस्टचा शोध लावला होता, त्यांनी आपल्या पेटंटचे रजिस्ट्रेशन देखील केले होते. त्यांनी आपल्या पेटंटची माहिती देताना असे सांगितले की, गाडी खूप चालवल्याने चालकाला आलेला थकवा दूर करण्यासाठी याचा वापर होऊ शकतो, तसेच अर्जंट ब्रेक दाबल्यानंतर चालकाच्या किंवा प्रवाश्यांच्या डोक्याला आणि मानेला काही इजा होऊ नये म्हणून याचा वापर करता येऊ शकतो. मात्र गाडीमध्ये अडकल्यावर गाडीची काच फोडून बाहेर पडण्यासाठी याचा वापर करतात, हे असे त्यांनी कुठेही सांगितले नाहीये.१९३० मध्ये विस्कोन्सिन स्थित स्वेवर क्विझिंग यांनी या हेडरेस्टमध्ये काही बदल केले, त्यांना सुद्धा त्यासाठी एक वेगळे पेटंट देण्यात आले. त्यांनी यामध्ये सागितले होते की, ह्या नव्या हेडरेस्टचा वापर जॅकेट आणि इतर कपडे टांगण्यासाठी होऊ शकतो आणि मानेला आराम देण्यासाठी देखील होऊ शकतो. पुढे १९५० मध्ये डेट्रोइट येथे राहणाऱ्या लॉरन्स स्कॉट याला अजून एक पेटंट दिले गेले. त्यांनी या हेडरेस्टमध्ये आणखी काही बदल केले. त्यांनी सांगितले की, मी नव्याने बनवलेला हेडरेस्ट हा आपण काढून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा लावू शकतो. मात्र त्यांनी त्याचा उपयोग काच फोडून संकटकाळी बाहेर पडण्यासाठी होतो, असं कुठेही सांगितले नाहीये.

तर आता आपल्या सर्वांना कळालंच असेल कि, गाड्यांचा सीटवर असणाऱ्या ‘हेडरेस्टचा’ उपयोग नक्की कश्यासाठी, कसा आणि काय होतो ते. जर आपण सुद्धा असं समजत असू कि, संकटकाळी बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग होतो, तर हा आपला सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि कदाचित तो आता नक्कीच दूर झालेला असेल.