गजा मारणे रॅली प्रकरणी भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल दळवी सह 8 जणांना अटक

0
437

पुणे, दि. 21 (पीसीबी)– कूविख्यात गुंड गजानन मारणे याच्या तळोजा ते पुणे रॉयल इन्ट्रीत सहभागी झालेल्या वाहन आणि तरुणांवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू असून, शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाच्या भाजप युवा मोर्चा अध्यक्ष असलेल्या राहुल दळवी याच्यासह 8 जणांना अटक केली आहे. तर 6 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.

राहुल विठ्ठल दळवी (वय 35, रा. वडगाव शेरी), मेहबूब मोर्तुजा महंमद सय्यद (वय 33), राजशेखर यल्लाप्पा बासगे (वय 26), जयवर्धन जयपाल बिरगाळे (वय 24), लक्ष्मण एकनाथ आल्हाट (वय 40), सुनील ज्ञानोबा कांबळे (वय 36), धनंजय सुभाष हांबीर (वय 31), किरण विजय माझीरे (वय 30) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

कारागृहातून बाहेर पडल्यानंतर रॉयल इंट्री मारताना रॅली काढत पुण्यात दाखल झाल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात गज्या मारणे, त्याचे साथीदार आणि समर्थक अश्या 150 ते 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता पुणे पोलीस या रॅलीत सहभागी झालेल्या गाड्यांचा आणि तरुणाचा शोध घेत आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड पोलीस कारवाई करत आहेत. दरम्यान आज पुणे पोलिसांनी 6 आलिशान वाहने जप्त केली. त्यात राहुल दळवी देखील सहभागी झाला होता, असे सांगण्यात आले आहे. त्याने दोन गाड्या हायर करत या रॅलीत सहभागी झाला होता.

या पोलीस टोयोटा लँड क्रूझर, फोर्ड एडेव्हर, टोयोटा फॉर्च्युनर, टाटा नेक्सॉन, किया, मर्सडीज, ऑडी अश्या गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सहभागी झालेल्या तरुणाचे आणि त्या गाडी मालकांचे धाबे दणाणले आहेत.