आता एकाच कॉलवर मिळणार पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिकेची सेवा; फक्त डायल करा ‘हा’ नंबर

0
535

पिंपरी,दि.३०(पीसीबी) – राज्य स्तरावर ‘डायल 112’ ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील ही हेल्पलाईन कार्यान्वित झाली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना याबाबत प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनेही यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना ‘डायल 112’ या एकाच हेल्पलाईनवर आता पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका या तीन सेवांची मदत मिळणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत घेण्यासाठी 100 क्रमांक डायल केला जातो. अग्निशमन विभागाच्या मदतीसाठी 101 आणि रुग्णवाहिकेच्या मदतीसाठी 102 हा क्रमांक डायल केला जातो. वेगवेगळ्या मदतीसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन सध्या सुरु आहेत. मात्र या तिन्ही हेल्पलाईन एकाच क्रमांकावर आणण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवला आहे.

‘डायल 112’ ही हेल्पलाईन शासनाने राज्यस्तरावर सुरु केली आहे. या हेल्पलाईनचे प्रायमरी कॉन्टॅक्ट सेंटर महापे, नवी मुंबई येथे आहे. तर सेकंडरी कॉन्टॅक्ट सेंटर नागपूर येथे आहे. नागरिकांनी 112 या हेल्पलाईनवर फोन केल्यास संबंधित कॉलरला पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका यापैकी कोणती मदत पाहिजे आहे, याबाबत विचारले जाते.

पोलीस मदत पाहिजे असल्यास तात्काळ कॉलर व्यक्तीचे लोकेशन बघितले जाते. त्यानुसार ती व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, त्या परिसरातील पोलीस नियंत्रण कक्षात क्षणात माहिती दिली जाते. सर्व पोलीस नियंत्रण कक्षांमध्ये 112 या हेल्पलाईनसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षातील 112 हेल्पलाईनच्या संगणकावर कॉलरची माहिती दिली जाते. त्यानंतर नियंत्रण कक्षातून कॉलर व्यक्तीच्या जवळपास जे हेल्पलाईन वाहन उपलब्ध आहे, त्या (रीस्पॉडंट) वाहनातील यंत्रणेवर माहिती दिली जाते. रीस्पॉडंट पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन कॉलरला मदत करतात.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी एक आणि नियंत्रण कक्षासाठी एक अशी 19 चारचाकी वाहने देण्यात आली आहेत, तर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 44 दुचाकी देखील देण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातील दोन पोलीस अधिका-यांना या हेल्पलाईन बाबत (सुपरवायजर) प्रशिक्षण देण्यात आले असून आणखी चार अधिका-यांना (सुपरवायजर) प्रशिक्षण दिले जाणार आहे. यातील एक अधिकारी सध्या प्रशिक्षण घेत आहेत.

नियंत्रण कक्षातील 14 पोलीस अंमलदारांना प्रेषक (डिस्पॅचर) प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यांमधील 237 पोलीस अंमलदारांना प्रतिसादक (रीस्पॉडंट) प्रशिक्षण देण्यात आले आहे.

112 हेल्पलाईनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे म्हणाले, “डायल 112 ही हेल्पलाईन राज्यस्तरावर सुरु करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर पासून पिंपरी-चिंचवड शहरात देखील ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर दररोज सुमारे 50 ते 75 फोन येतात. प्रायमरी कॉन्टॅक्ट सेंटर कडून याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षात माहिती मिळते. त्यानंतर तात्काळ मदतीसाठी पोलिसांना पाठवण्यात येते.”