“….आणि म्हणून त्या तरुणाला टेरेसवरून निर्दयीपणे ढकलले’; पिंपरीतील धक्कादायक घटना; तब्बल १७ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

0
301

पिंपरी, दि.०३ (पीसीबी) : प्रियकर पती व मुलांसोबत झोपलेल्या महिलेला भेटायला आला. त्यानंतर महिलेच्या मामेभावाने व त्याच्या साथीदारांनी प्रियकराला अपार्टमेंटच्या टेरेसवरून ढकलून दिले. यात जखमी झालेल्या प्रियकराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी १७ जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरीगाव येथे शुक्रवारी (दि. ३०) ही घटना घडली. अक्षय अनिल काशिद (वय २०, रा. पवारनगर, थेरगाव), असे खून झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा बाळू पारधे उर्फ बाॅक्स, बाळ्या, तौसिफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपील टाक, तरुण टाक, आतिश ननावरे, जय पिवाल, विनय बेद, सद्दाम शेख, खलील शेख, अरुण टाक, जतीन टाक, खूबचंद मंगतानी (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घराच्या बेडरुममध्ये पती व मुलीसह झोपल्या होत्या. तसेच त्यांच्या पाठीमागील बेडरुममध्ये त्यांचा मामाचा मुलगा आरोपी कृष्णा पारधे व त्याची पत्नी हे दोघे झोपले होते. त्याच बेडरुमच्या पाठीमागील दरवाजावर कोणीतरी दगड फेकून मारत होते. काही वेळानंतर कोणीतरी फ्लॅटचा दरवाजा वाजवला म्हणून फिर्यादीने दरवाजा उघडला असता मयत अक्षय काशिद तेथे असल्याचे दिसले. तू इतक्या रात्रीचा कशाला आला आहे, असे फिर्यादी म्हणाल्या. इतका वेळ झाला तरी तू दरवाजा का उघडत नव्हतीस, तुझ्या बेडरुमसमोर कोणाच्या चपल्या आहेत, असे अक्षयने फिर्यादीला विचारले. बेडरुममध्ये माझ्या मामाचा मुलगा व त्याची बायको झोपली आहे, असे फिर्यादीने सांगितले. आत कोण झोपला आहे, त्याला तू बाहेर बोलव, असे म्हणून अक्षयने आरडाओरडा केली. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करू लागला. त्यामुळे आरोपी कृष्णा पारधे बेडरुममधून बाहेर आला. तू कोण आहेस, तू येथे काय करतोस, असे कृष्णाने विचारले. अक्षय व मी लग्न करणार आहे, तू त्याला काही बोलू नकोस, असे फिर्यादीने आरोपी कृष्णाला सांगितले. आरोपी कृष्णा त्याच्या साथीदारांना घेऊन आला.

दरम्यान फिर्यादी या पहाटे तीनच्या सुमारास मयत अक्षय याला अपार्टमेन्टच्या टेरेसवर घेऊन गेल्या. तेथे त्या अक्षयला समजावत असताना तेथे आरोपी कृष्णा व त्याचे मित्र बाळ्या व तौसिफ तसेच इतर आरोपीही तेथे आले. त्यांनी मयत अक्षयला मारहाण केली. त्यावेळी तो जिन्याने पळून जात असताना आरोपींनी त्याला पुन्हा टेरेसवर घेऊन गेले. त्यावेळी फिर्यादीची आई व भाऊ भांडणे सोडवत असताना कोणीतरी फिर्यादीच्या आईला लाथ मारली. त्यामुळे फिर्यादी व त्यांचा भाऊ त्यांच्या आईला खाली घेऊन गेल्या. त्यावेळी आरोपींनी अक्षय याला टेरेसवरून खाली ढकलून देऊन पळून गेले. यात जखमी झालेल्या अक्षय याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यानुसार आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मारहाण करीत असताना मयत अक्षय याने फिर्यादी महिलेचा मोबाइल घेऊन पोलिसांना फोन केला. मला पोलीस मदत पाहिजे, असे अक्षयने फोनवर सांगितले. त्यावेळी आरोपींनी त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेत त्याला मारहाण केली. तेव्हा जीव वाचवण्यासाठी अक्षयने आरडाओरडा करीत जिन्यावरून खाली पळून जाऊ लागला. त्यामुळे अपार्टमेन्टमधील लोक बाहेर येऊउन पाहू लागले. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या हातातील लाकडीदांडके उंचावून लोकांना धमकावले. आमच्यामध्ये कोणी पडले तर त्याला जिवंत सोडणार नाही, आम्ही खुबचंद मंगतानीची माणसं आहोत, अशी धमकी देऊन आरोपींनी अपार्टमेन्टमधील लोकांमध्ये दहशत निर्माण केली.