आघाडीचे उमेदवार संग्राम जगतापांचा अर्ज भरायला जाणार नाही – राधाकृष्ण विखे-पाटील

0
612

मुंबई, दि. ३० (पीसीबी) –  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे दक्षिण अहमदनगरचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार नाही. मी राज्यात प्रचार करणार, आघाडींच्या सभांना जाणार मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज भरायला मी जाणार नाही, असे काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज (शनिवार)  मुंबईत बैठक झाली . या बैठकीला महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, हर्षवर्धन पाटील,  आदी नेते उपस्थितीत होते. या बैठकीला विखे-पाटील हजर राहणार का? याकडे लक्ष लागले होते. मात्र, विखे यांनी या बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पूत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना दक्षिण अहमदनगरमधून भाजपने उमेदवारी दिली आहे. यामुळे राधाकृष्ण विखे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. राधाकृष्ण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार, अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र, विखे राज्यात आघाडीचा धर्म पाळणार आहेत. पण नगरमध्ये  आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.