सांगलीत स्वाभिमानीकडून विशाल पाटील लढणार; राजू शेट्टींची घोषणा  

0
735

सांगली, दि. ३० (पीसीबी) –  सांगली लोकसभा  मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अखेर वसंतदादांचे नातू व  काँग्रेस नेते विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व  खासदार राजू शेट्टी यांनी आज (शनिवार)  सांगलीत पत्रकार परिषदेत ही   घोषणा  केली.

विशाल पाटील स्वाभिमानीकडून २  तारखेला अर्ज दाखल करणार आहेत. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांना स्वाभिमानीकडून एबी फॉर्म देण्यात येणार आहे, असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सांगलीच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला  पेच अखेर सुटला आहे.

सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडूनच लढणार अन्यथा अपक्ष म्हणून लढणार, अशी ठाम भूमिका  विशाल पाटील यांनी घेतली होती.  शुक्रवारी रात्री  खासदार शेट्टी आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.