निगडीतील परिमंडळ कार्यालय बंद; संबंधितांवर कारवाई करण्याची मानवाधिकार संघटनेची मागणी

0
709

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – निगडी येथील परिमंडळ अधिकारी यांचा इलेक्शन ड्युटी व ऑनलाईनच्या नावाखाली नविन दुबार नुतनीकरण व विभक्त शिधापत्रिकेचे कामकाज बंद ठेवून मनमानी कारभार सुरू आहे. दोन–दोन महिने अर्ज करून देखील नागरिकांना शिधापत्रिकेसाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई  करण्यात यावी, अशी मागणी मानवाधिकार संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे  करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्या दिवशी कार्यालय सुरू करायचे आणि कोणत्या दिवशी कार्यालय बंद ठेवायचे हे अधिकारी परस्पर ठरवतात. त्यामुळे कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मंगळवारी (दि. २६) कोणतेही कारण नसताना निगडी येथील परिमंडळ कार्यालय बंद ठेवण्यात आले होते.

तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून परिमंडळ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार थांबवावा. परिमंडळ अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळे काही स्वस्त धान्य दुकानदार किराणा दुकानातील माल घेतल्याशिवाय शिधापत्रिकेवरील गहू, तांदूळ मिळणार नाही, अशी सक्ती केली जाते. त्याचबरोबर शिधापत्रिकेवरील गहू, तांदूळ, तुरडाळ, चनाडाळ, उडीदडाळ, तेल पिशवी, मीठ आदी वस्तू देण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन, कार्याध्यक्ष भरत वाल्हेकर, सुभाष कोठारी, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय मैड, विकास कांबळे, दिलीप टेकाळे, मुनीर शेख, अविनाश रानवडे, सतिश नगरकर, लक्ष्मण दवणे आदी उपस्थित होते.