आकुर्डीतील मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी १७ हजारांचा ऐवज केला लंपास

0
617

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – मोबाईलचे दुकान कुलुप लावून बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कटावनी आणि स्क्रु ड्रायवरच्या सहायाने दुकानाचा दरवाजा उचकटून त्यातील रोख ५ हजार आणि १२ हजारांचा एक लॅपटॉप असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवार (दि.१२) रात्री साडेअकरा ते मंगळवार (दि.१३) सकाळी सातच्या दरम्यान आकुर्डी येथील ज्ञानेश्र्वर कॉलनी मेन रोडवरील जय मोबाईल शॉपी या दुकानात घडली.

याप्रकरणी दुकानाचे मालक ओमप्रकाश लवकुश सोनी (वय ३४, रा. सिध्दी रेसीडेन्सी, फ्लॅट नं. २०६, स्पाईन रोड चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी यांचे आकुर्डी येथील ज्ञानेश्र्वर कॉलनी मेन रोडवर जय मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी  सकाळी सातच्या दरम्यान दुकान बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस असलेला लाकडी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील रोख रक्कम ५ हजार आणि १२ हजारांचा एक लॅपटॉप असा एकूण १७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.