आकर्षक वॉल पेटींगचे काम वसुंधरा अभियानाच्या कामातून करणार; 55 लाखाचा वाढीव खर्च

0
424

पिंपरी दि. 5 (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरण जनजागृतीसाठी शहरात ठिकठिकाणी आकर्षक वॉल पेटींग, बोर्ड, फ्लेक्स बसविण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. या कामाअंतर्गत स्वच्छाग्रही व स्वच्छ भारत अभियानासाठीही अशाच प्रकारे आकर्षक वॉल पेटींगची कामे करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. त्याकरिता वसुंधरा अभियानाअंतर्गत काम दिलेल्या ठेकेदाराला त्याच निविदा दराने काम देण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाखाचा वाढीव खर्च होणार आहे.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिका हद्दीत पर्यावरण जनजागृतीसाठी आकर्षक वॉल पेटींग, बोर्ड, फ्लेक्स बसविण्याचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. या कामाअंतर्गत माझी वसुंधरा अभियानाशी संबंधित जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वाशी निगडीत जनजागृतीसाठी शहरात मुख्य चौक, रस्त्यालगतचा शाळा परिसर, मैलाशुद्धीकरण केंद्रासमोरील भिंती, पाण्याच्या टाक्या तसेच अभियानाशी संबंधित महत्वाच्या ठिकाणी वॉल पेटींगची कामे करण्यात येत आहेत. हे काम ओम एंटरप्रायजेस या ठेकेदारामार्फत निविदा दराच्या 5.20 टक्के कमी दराने करण्यात येत आहे.

अद्यापपर्यंत काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. या कामाने शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. 22 डिसेंबर 2021 रोजी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासमवेत स्वच्छ भारत अभियानासंबंधी बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांनी माझी वसुंधरा अभियानासह स्वच्छाग्रही व स्वच्छ भारत अभियानासाठीही शहरात अशाच प्रकारे आकर्षक वॉल पेटींग चालू कामातून करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी 28 डिसेंबर 2021 रोजीच्या पत्रानुसार, स्वच्छ भारत व स्वच्छाग्रही अभियानासाठी 121  ठिकाणी आकर्षक वॉल पेटींग स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 पूर्वी म्हणजेच डिसेंबर 21 अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत विनंती केली आहे. त्यासाठी येणारा वाढीव खर्च आरोग्य मुख्य कार्यालयाकडील ‘आरोग्य विषयक शासकीय योजनांच्या अंमलबजावणी व आरोग्य विषयक जनजागृती’ या लेखाशिर्षावरून खर्च करण्यात येणार आहे.

तथापि, पर्यावरण विभागामार्फत सद्यस्थितीत चालू असलेल्या माझी वसुंधराच्या निविदा कामातून स्वच्छाग्रही व स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पर्यावरण पुरक व स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित वॉल पेटींगची कामे करणे शक्य होणार नाही. तसेच नवयाने निविदा कार्यवाही करायची असल्याने त्यामध्ये जास्त कालावधी होऊन काम डिसेंबर 2021 पूर्वी पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे कामाची आवश्यकता आणि तातडीक लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पर्यावरण जनजागृतीसाठी आकर्षक वॉल पेंटींग बोर्ड, फ्लेक्स बसविणे या निविदा मंजूर कामातूनच ही कामे करणे तसेच मंजूर दराने कामाची व्याप्ती वाढवून सुधारीत तांत्रिक मान्यता घेऊन याच कामातून आवश्यक कामे करून घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.

या कामांसाठी 4 जून 2020 रोजी महापालिका सभेने 1 कोटी रूपये इतकी प्रशासकीय मान्यता दिली आहे. अतिरिक्त आयुक्तांकडील 15 जानेवारी 2021 रोजीच्या मंजूर प्रस्तावान्वये 42 लाख 1 हजार रूपयांपर्यंतच्या निविदा कामाच्या खर्चास मान्यता मिळाली आहे. या कामाच्या व्याप्तीत वाढ होत असल्याने माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विविध कामांसाठी निविदा मंजुर कामाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यास सुधारीत तांत्रिक मान्यता घेतली असता त्याची सुधारीत निविदा रक्कम 99 लाख 89 हजार रूपये इतकी येत आहे. त्यानुसार, या कामासाठी 57 लाख 87 हजार रूपये इतका सुधारीत वाढीव खर्च होणार आहे.