असं झालं तर कोणतंच सरकार टिकू दिलं जाणार नाही…

0
153

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – गेल्या महिन्याभरापासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान सर्वात आधी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली होती. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. नंतर राज्यपाल आणि शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तिवाद केला. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून फेरयुक्तिवाद केला जात आहे. त्यामध्ये कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात भावनिक आवाहन केलं. तसेच, न्यायालयाच्या उज्ज्वल इतिहासाचीदेखील आठवण करून दिली.

काय म्हणाले कपिल सिब्बल?
कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवताना राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करण्याचा घेतलेला निर्णय रद्द ठरवण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी न्यायालयात भावनिक होऊन भूमिका मांडली. “या न्यायालयाचा इतिहास हा घटनेच्या तत्वांचं संरक्षण करण्याचा राहिला आहे. एडीएम जबलपूरसारखे काही वेगळे प्रसंग आले. पण त्याच प्रकरणाइतकंच हे प्रकरण महत्त्वाचं आणि प्रभाव पाडणारं आहे”, असं कपिल सिब्बल म्हणाले.

“हा या न्यायालयाच्या इतिहासातला एक असा प्रसंग आहे, जेव्हा लोकशाहीचं भवितव्य ठरवलं जाणार आहे. मला याची खात्री आहे, की या न्यायालयानं जर मध्यस्थी केली नाही, तर आपण, आपली लोकशाही धोक्यात येईल. कारण कोणतंच सरकार अशा प्रकारे टिकू दिलं जाणार नाही. या आशेवर मी माझा युक्तिवाद संपवतो आणि तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्यपालांचे आदेश रद्द करा”, असं म्हणत कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला.

शिंदे गटावर आक्षेप
दरम्यान, यावेळी शिंदे गटानं आसाममधून तत्कालीन शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांना पदावरून हटवल्याच्या पाठवलेल्या पत्रावरही आक्षेप घेतला. “आसाममध्ये बसून ३९ लोकांनी सुनील प्रभूंची नियुक्ती रद्द केली. ही कुठली प्रतिक्रिया आहे? ते २०१९पासून प्रतोदपदी आहेत”, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला. “राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात पक्षानं ज्या व्यक्तीला पदावरून दूर केलं आहे, त्याच व्यक्तीला मान्यता कशी काय दिली?” असाही सवाल सिब्बल यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.