अश्विनी जगताप जिंकल्या, आता भाऊंची स्वप्नपूर्ती म्हणून मंत्रीपदाची चर्चा

0
307

पिंपरी, दि.३ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये अजित पवार यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेतून खाली खेचून भाजपकडे सत्ता देण्याचे सर्व श्रेय दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना जाते. दुसरे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांना हातभार लावला. त्यावेळी या सत्तांतराचे बक्षिस म्हणून आमदार जगताप यांनी लाल दिवा मिळणार अशी चर्चा होती. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा त्यावेळी,`महापालिकेत सत्ता दिलीत, तर पिंपरी चिंचवड शहराला लाल दिवा देणार`, असे प्रचार सभांतून जनतेला आश्वासन दिले होते.

सलग तीनवेळा आमदार असल्याने नक्कीच जगताप यांना मंत्रीपद मिळेल, असे कार्यकर्त्यांनासुध्दा वाटले. मधेच काय जादू झाली माहित नाही, पण आमदार जगतपा यांचे नाव बाजुला गेले आणि भोसरीकर आमदार महेश लांडगे यांचे नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत चर्चेला आले. स्वतः फडणवीस यांनी आताच्या पोटनिवडणूक प्रचारातसुध्दा आमदार जगताप यांना मंत्रीपद देण्याचे राहून गेल्याचा उल्लेख केला होता. प्रत्यक्षात फडणवीस यांचा पहिला पाच वर्षांचा संपूर्ण कार्यकाळ संपला. आता दुसऱ्या टर्ममध्ये ते उपमुख्यमंत्री झाले, पण जगताप यांना दिलेला शब्द विसरुन गेले. शिवसेना फोडली तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळासाठी आपला विचार होईल आणि शेवटची इच्छा पूर्ण होईल अशीही आमदार जगताप यांची अपेक्षा होती.

आजारी असतानासुध्दा आमदारांना अखेरची इच्छा मंत्री किंवा राज्यसभा खासदारकी मिळावी, अशी अंतिम इच्छा होती. दुर्दैवाने आमदार जगताप यांची ते स्वप्न अधुरेच राहिले. कारण अखेरपर्यंत मंत्रीपद काय साधे महामंडळसुध्दा त्यांना मिळाले नाही. आता आमदार जगताप यांचे ते अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची भाजप कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. तीन वेळा आमदार आणि अजित पवार यांची सत्ता हिसकावून भाजपकडे सोपविली म्हणून तसेच आता पोटनिवडणुकितसुध्दा श्रीमती अश्विनी जगताप यांनी पुन्हा भाजपला चिंचवडची आमदारकी मिळवून दिली म्हणून मंत्रीमंडळ विस्तारात त्यांचा विचार होईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते बोलून दाखवितात.

आमदार लक्ष्मण जगताप यांना दहा वर्षांत भाजपने काय दिले, असा जाहीर सवाल मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल शेळके यांनी आताच्या पोटनिवडणुकित भर प्रचारसभांतून केला होता. बहुसंख्य मतदार, कार्यकर्ते आणि आमदार जगताप समर्थकांनाही तो खूपच भावला. महापालिकेत सत्ता आणली त्याचे बक्षिस म्हणून जगताप यांना साधे मंत्रीपदसुध्दा मिळून नये याची मोठी खंत आहे. आता किमान फडणवीस यांनी आमदार जगताप यांचे ते अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्रीमती अश्विनी जगताप यांना राज्यमंत्रीपद बहाल करावे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.
श्रीमती अश्विनी जगताप यांना सभा कामकाजाचा अनुभव नसला तरीसुध्दा त्यांनी आपले पती आमदार लक्ष्मण जगताप यांना राजकारणात खंबीर साथ दिली. तसेच आजवरच्या महापालिका, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा अशा सर्वच निवडणुकांमध्ये प्रचारात सक्रीय सहभाग घेतला होता. श्रीमती जगताप या शिक्षित, विचारी, खंबीर, निर्णयक्षम आणि महत्वाकांक्षी असल्याने त्या शहराचेही नेतृत्व करु शकतात. यापूर्वी विविध निर्णय प्रक्रीयेत त्यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असायचा.

असा सर्व अनुभव विचारात घेऊन आगामी महापालिकेत सत्ता आणण्यासाठी श्रीमती जगताप यांनी राज्य मंत्रीमंडळ विस्तारात संधी दिली तर राष्ट्रवादीला शह देणे शक्य होईल, असाही भाजप मधील काही जेष्ठांचा होरा आहे. भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जगताप यांचे योगदान माहित असल्याने तेसुध्दा त्या दिशेने विचार करतील आणि महिला आमदार म्हणून श्रीमती जगताप यांना संधी देतील, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ३० लाख लोकसंख्येच्या या शहरात आज महिला मतदारांची संख्या सुमारे १३ लाखावर आहे. ५० टक्के महिला नगरसेविका असणार आहेत. त्या सर्वांचे प्रतिनिधीत्व आता श्रीमती जगताप यांच्याकडे असेल. त्या अर्थाने श्रीमती जगताप यांची आमदारकी आणि संभाव्य मंत्रीपदसुध्दा खूपच महत्वाची आहे.
भाजपने गेल्यावेळी सत्ता आली त्यात निष्ठावंतांपैकी अमर साबळे यांना रातोरात राज्यसभावर संधी दिली आणि अनपेक्षितपणे थेट खासदारकी बहाल केली. गोपीनाथ मुंडे यांचे कट्टर समर्थक प्रा. सदाशिव खाडे यांना अनेक रथीमहारथींना विरोध केला, पण स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद दिले.

मातंग समाजाताली अत्यंत सर्वसामान्य पण कर्तुत्ववान युवक कार्यकर्ता म्हणून अमित गोरखे यांना सुमारे ५०० कोटींचे बजेट असलेल्या लोकशाहिर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद दिले. कायदेतज्ञ आणि चंद्रकांत पाटील यांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सलग दोनवेळा दिले. अशा प्रकारे राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली तीन पदे भाजपच्या निष्ठावंतांना दिली, मात्र ज्यांनी या शहरातील राष्ट्रवादीला आणि अजित पवार यांना हद्दपार केले त्या आमदार लक्ष्मण जगताप यांना अखेरपर्यंत भाजपने कोणतेही मोठे पद दिले नाही याची तीव्र खदखद जगताप यांच्या हजारो समर्थकांमध्ये आजही कायम आहे. किमान आता श्रीमती अश्विनी जगताप यांना किमान राज्यमंत्रीपद द्यावे आणि ती कमतरता दूर करावी, अशी अनेकांची अपेक्षा आहे. महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता पाहिजे असेल तर आता श्रीमती जगताप यांना मत्रीमंडळ विस्तारात संधी मिळालीच पाहिजे, असाही आग्रह समर्थकांचा आहे.