…अन्यथा आगामी निवडणुकीत महिलाच मुख्यमंत्र्यांना ‘वर्षावरून ‘बेपत्ता करतील – शालिनी ठाकरे

0
739

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  राज्यातील महिला आपला भाऊ मानतात.  दरवर्षी त्यांना राखी बांधली जाते. मात्र,  मुख्यमंत्री आणि गृहमंत्री  फडणवीस यांना या नात्याचा आणि पदाचाही विसर पडला आहे.  बेपत्ता मुली- महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करावे. अन्यथा, आगामी निवडणुकीत राज्यातील महिला  मुख्यमंत्र्यांनाच ‘वर्षावरून ‘बेपत्ता’करतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.

मुंबईतून महिला आणि मुलींच्या बेपत्ता होण्याच्या  प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होत झाल्याबाबत   विधानसभेमध्ये भाजप आमदार मंगलप्रभात लोढा आणि इतर आमदारांनी विचारलेल्या प्रश्नाला लिखित उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आकडेवारी दिली होती.  यावरून ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

२०१३ सालापासून मुंबईतून २६ हजारापेक्षा जास्त मुली आणि महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी २ हजार २६४ जणींचा अद्यापही शोध लागलेला नाही. यावरून ठाकरे यांनी मुख्यमंत्री  यांच्यावर टीका केली आहे. सव्वादोन हजार मुली नेमक्या कुठे गेल्या, याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. यासारखी  लाजीरवाणी गोष्ट कोणती ?, असा सवाल त्यांनी  केला आहे.

मुली- महिला  अशा पध्दतीने गायब होण्यामागे नेमका अर्थ काय काढायचा?  यामागे एखादी मानवी तस्करी टोळी कार्यरत आहे का?  गृहमंत्र्यांना आणि  पोलीस यंत्रणेला जर बेपत्ता मुली चार-पाच वर्षात शोधून काढता  येत नसतील, तर राज्य महिला आयोग या गंभीर प्रकाराची स्वतःहून दखल का घेत नाही ? असे सवाल   त्यांनी उपस्थित केला आहे.