पिंपळे गुरव येथील गोडाऊनमधून १ लाख २६ हजारांचा गुटखा जप्त; आरोपी अटक

0
733

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) – गुटखा विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली असून त्याच्या गोडाऊन मधून तब्बल १ लाख २६ हजारांचा विविध कंपन्यांचा गटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.२०) पिंपळे गुरव येथे केली.

छोगाराम पेमाराम चौधरी (वय ३४, रा. सृष्टी अपार्टमेंट, सृष्टी चौक पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्कराचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सांगवी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळे गुरव येथे अंमली पदार्थ विरोधी पथक गुटखा विक्रीच्या गुन्ह्यास प्रतिबंध व्हावा म्हणून गस्त घालत होते. यावेळी अशोकनगर येथील पोस्ट ऑफिसच्या पाठीमागच्या बाजूस आरोपी छोगाराम चौधरी  हा संशयीतरित्या उभा असलेला पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो गुटखा विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचे गोडाऊन तपासले असता त्यामध्ये तब्बल १ लाख २६ हजारांचा विविध कंपन्यांचा गुटखा आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, सहायक उपनिरीक्षक टि.डी.घुगे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजन महाडीक, बाळासाहेब सुर्यवंशी, रमेश भिसे, राजेंद्र बांबळे, प्रसाद जंगीलवाड, संतोष दिघे, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे आणि अशोक गारगोट यांच्या पथकाने केली आहे.