अतिक्रमणांवरील कारवाई यापुढेही सुरुच राहणार – आयुक्त पाटील

0
236

पिंपरी दि. २३ (पीसीबी)
– पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरील कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यापासून शहरातील अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर जोरदार कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत एक हजार कारवाया करण्यात आल्या आहेत. 14 लाख 69 हजार चौरस फुटावरील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड भुईसपाट झाली आहेत. अतिक्रमणांवरील कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील म्हणाले, मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर शहरात जिजाऊ क्‍लिनिक लवकरात-लवकर सुरू केले जाणार आहे.  

पाण्याचे  नियोजन सुरू आहे. यासाठी भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून 268 एमएलडी पाणी कसे आणता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येक मिळकत धारकांकडे पाणी मीटर असावेत, पाणी गळती रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शहरात नव्याने सुरू केलेल्या चार रूग्णालयांमुळे रूग्णांची चांगली सोय झाली आहे. वैद्यकीय विभागासाठी आणखी काही प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही आयुक्त पाटील म्हणाले.