अजित पवार तुमच्याकडून राजकारण शिकलो; चंद्रकांत पाटलांची कोपरखळी

0
847

मुंबई, दि. २९ (पीसीबी) मराठा आरक्षणासंदर्भातील  संवेदनशील प्रश्नासंदर्भात सरकार जल्लोष कसा काय करू शकते?  असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी करत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो असून काहीही चूक करणार नाही, अशी  कोपरखळी पवारांना मारली.

तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कृती अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यावर साधक बाधक चर्चा अपेक्षित आहे, असे सांगून जर अधिवेशनाची वेळ कमी पडली तर ती वाढवू, परंतु विधानसभेच्या याच अधिवेशनात  आरक्षणासंदर्भातील कायदा मंजूर करू, असे पाटील म्हणाले.

मराठा समाजाने आरक्षणाची मागणी दीर्घकाळ लावून धरली आहे.  ती आता पूर्ण होणार आहे. अनेक कायदेशीर अडथळे पार करून मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळात सादर केले जाईल. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.