अजित पवारांचा आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा; राष्ट्रवादीत खळबळ

0
444

मुंबई, दि. २७ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आज (शुक्रवार) सुपूर्त केला.  त्यांचा राजीनामा बागडे यांनी मंजूर केला आहे. राजीनामा दिल्यानंतर पवार यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र,  त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिला आहे. पक्षांतर्गत कुरबुरींमुळे आणि शिखर बँक घोटाळ्यात नांव आल्याने  त्यांनी राजीनामा दिला असावा, असा  अंदाज वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कार्यालयात येऊन माझ्या पीएकडे राजीनामा दिला. तसेच मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केली, असे बागडे यांनी सांगितले. राजीनामा पत्रात त्यांनी कोणतेही कारण दिलेले नाही. तसे कारणही देत नसतात, असेही बागडे यांनी सांगितले.