अखिलेश यादव यांचे काँग्रेसला समर्थन; मायावतींचे पत्ते गुलदस्त्यात

0
391

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकांचे सात टप्प्यांमधील मतदान पार पडले असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची आज दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला हजर राहणार नसल्याचं स्पष्ट करत बसपा प्रमुख मायावती यांनी आपले पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. तर दुसरीकडे निकालानंतर गरज पडल्यास काँग्रेसला पाठिंबा देऊ असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जाहीर केलं आहे.

‘कर्नाटक प्लॅन’च्या धरतीवर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू सध्या प्रयत्न करत आहेत. २०१७ मध्ये सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप कर्नाटकात सत्तेत येऊ शकला नव्हता. तिथे काँग्रेस-जेडीएसने एकत्र सत्ता स्थापन केली होती. याच धरतीवर चंद्राबाबू नायडू, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज मायावती यांची भेट घेणार होते. त्यासाठी मायावती लखनऊहून दिल्लीला येणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. पण अशा कोणत्याच बैठकीला मायावती जाणार नसल्याचं स्पष्टीकरण आज बसपाचे महासचिव सतीश मिश्रा यांनी दिलं आहे.

तसंच २३ मे नंतर आपण कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार याबद्दल कोणतंही वक्तव्य करणं मायावतींनी टाळलं आहे. सर्वच एक्झिट पोल्सने भाजप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच पुन्हा सत्तेत येणार असल्याचं भाकीत वर्तवलं आहे. यामुळेच मायावतींनी बाळगलेल्या मौनाबद्दल राजकीय वर्तुळात साशंकता व्यक्त केली जात आहे. तर निकालांनंतर गरज पडल्यास काँग्रेसला समर्थन देऊ असं समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी जाहीर केलं आहे. याआधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्यावेळीही काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युती केली होती.

२०१४च्या निवडणुकांमध्ये मायावती यांच्या बसपाने देशभरातून ४१४ जागांवर निवडणूक लढवली होती पण एकही जागा त्यांना जिंकता आली नव्हती. २०१९मध्ये पारंपारिक वैरी असलेल्या समाजवादी पक्षासोबत मायावती यांनी आघाडी केली आहे. तेव्हा यावेळी उत्तर प्रदेशात मायावती किती जागा जिंकतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलं आहे. तसंच निकालानंतर मायावती एनडीएची वाट धरतात की काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसोबत राहतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.