काळवीट शिकार प्रकरण – सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांना नव्याने नोटीस

0
368

नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – काळवीट शिकार प्रकरणी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांना नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जोधपूर खंडपीठाने ही नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने निर्दोष मुक्त सुटका कऱण्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली. गतवर्षी ५ एप्रिल रोजी मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडून सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती.

राजस्थान सरकारने मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात याचिका केल्यानंतर जस्टीस मनोज गर्ग यांच्या एक सदस्यीय खंडपीठाकडून ही नोटीस बजावण्यात आली. ही नोटीस दुष्यंत सिंग यालाही बजावण्यात आली आहे. काळवीट शिकार झाली तेव्हा दुष्यंत सिंग सोबत होता असा आरोप आहे. न्यायाधीश मनोज गर्ग यांनी आठ आठवड्यांनंतर प्रकरणी सुनावणी केली जाईल असे सांगितले आहे.

सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलम यांच्या सुटकेविरोधात राज्य सरकार जोधपूर उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे याआधीही सांगण्यात येत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश गावरे जो बेपत्ता आहे त्यालाही याप्रकरणी आरोपी करण्यात यावे अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.