अखंड विद्युत पुरवठ्याची प्राधिकरणातील नागरिकांची मागणी

0
621

निगडी,दि.१२(पीसीबी) – निगडी प्राधिकरण भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांनी गुरुवार, दिनांक ११ जून २०२० रोजी महावितरण प्राधिकरण उपविभागीय अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांना कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिले. त्यांच्या समवेत भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अनुप मोरे, भाजपा पिंपरी-चिंचवड शहरउपाध्यक्ष राजेंद्र बाबर, भाजपा मंडल अध्यक्ष विजय शिनकर, माजी महापौर आर.एस. कुमार उपस्थित होते.

याबाबत शर्मिला बाबर यांनी सांगितले, की पाच-सहा महिन्यांपासून अनियमित वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यासाठी महावितरण कार्यालयात किंवा कनिष्ठ अभियंता यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु दूरध्वनी उचलला जात नाही किंवा भ्रमणध्वनीवरून समाधानकारक उत्तर मिळत नाही. लॉकडाउनमुळे अनेक तरुण-तरुणी घरातूनच कार्यालयीन कामकाज करीत आहेत. सकाळच्या वेळी गृहिणींची घरगुती कामांची धांदल असते. विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने या कामांचा बोजवारा उडतो; याशिवाय पाणीपुरवठ्याचे नियोजन विस्कळित होते. तसेच वीज कोणत्या वेळी अखंडपणे उपलब्ध होणार आहे यासंबंधी महावितरण कार्यालयातून निश्चित माहिती मिळत नसल्याने नागरिकांच्या उद्रेकाचे समाधानकारक निराकरण करता येत नाही. यामुळे नागरिकांसमवेत जाऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांची समक्ष भेट घेऊन याबाबतचे स्पष्टीकरण मागितले.

यावर अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी यांनी लॉकडाउनमुळे मनुष्यबळ कमी आहे, दुरुस्तीसाठी आवश्यक त्या साधन-सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे विलंब लागतो आणि दूरध्वनी नादुरुस्त असल्याने नागरिकांना कार्यालयाशी संपर्क साधता येत नाही इत्यादी अडचणी महावितरण कार्यालयाला आहेत, अशी बाजू मांडली.
यावेळी नागरिकांच्या वतीने नारायण पांडे, मयूर भिंगारे, जयंत अहिरराव, पांडुरंग मोहिते, मधुकर पाटील, हनुमंत जाधव, मधुकर कोल्हे, विशाखा बुरटे यांनी तीव्र शब्दांत आपल्या तक्रारी मांडल्या असता एक आठवड्याच्या कालावधीत अडचणींचा निपटारा करून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल अशी हमी चौधरी यांनी दिली.