आमदार महेश लांडगे यांचा उपक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाला कोकणवासीयांना ताडपत्री वाटप

0
403

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे, छत उडाल्यामुळे नागरिकांच्या निवार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महेशदादा स्पोर्ट्स फांडेशनच्या पुढाकाराने कोकणवासीयांना ताडपत्री वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (दि.10 जून) साजरा करण्यात आला. यानिमित्त कोकणात आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मदत कार्याच्या पहिल्या टप्प्यात दापोलीमधील हारणे, केळशी, सुकुंडी आणि आंजर्ली या भागात ज्या नागरिकांच्या घराचे छत उडाले आहेत. कौले फुटली आहेत. पत्रे उडाले आहेत. अशा नागरिकांना ताडपत्री वाटप करण्यात आले. अनिल पवार, योगेश शहा, मयूर ओढके यांनी समन्वय करुन नागरिकांना मदत केली आहे. आगामी काही दिवस पिंपरी-चिंचवडमधून कोकणवासींना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

पूर, कोरोना आणि आता निसर्ग…मदतीचा हात कायम
आमदार महेश लांडगे यांनी सांगली-कोल्हापूर जिल्हयातून पूरस्थिती निर्माण झाली. त्यावेळी एक हात मदतीचा’हा उपक्रम सुरू केला. सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्हयातील हजारो नागरिकांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एक हात मदतीचा’हा उपक्रम घेण्यात आला. त्याद्वारे भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील गरजू नागरिकांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले होते. आता निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणवासीयांनाही मदत देण्यासाठी आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. सामाजिक भान आणि कर्तव्याची जाणीव करुन देत या उपक्रमालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.