अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या चार जणांना अटक

0
165

पुणे, दि.31 पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 कोटी रूपये किंमतीचे 1 किलो वजनाचे मेथामाफेटामीन (अंमली पदार्थ – जप्त करण्यात आले आहे. याबाबत कस्टम विभागाने बुधवारी सकाळी माहिती दिली आहे.

सातरा येथून मोठया प्रमाणावर मेथामाफेटामीन या अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती पुण्यातील कस्टम विभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानुसार कस्टम विभागाच्या पथकाने तयारी सुरू केली.

कस्टम विभागाच्या पथकाने सातार्‍यावरून आरोपींच्या काळया रंगाच्या फोर्ड एन्डेव्हर या गाडीचा पाठलाग सुरू केला. खेड शिवापूर टोलनाका येथे गाडी आली असताना पथकाने गाडी थांबविली. दरम्यान, त्यावेळी काहीसा गोंधळ देखील टोल नाक्यावर उडाला होता अशी चर्चा आहे. पथकाने गाडी थांबविली त्यावेळी गाडीत दोघे जण होते. त्यांच्या ताब्यातुन 850 ग्रॅम मेथामाफेटामीन जप्त करण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्यांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्याचे दोन साथीदार लोणावळयात भेटणार असल्याचे सांगितले.

कस्टम विभागाच्या पथकाने लोणावळयातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देखील सुमारे 200 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
एकुण कस्टम विभागाने 1 किलो वजनाचे आणि 5 कोटी रूपये किंमतीचे मेथामाफेटामीन हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत