अंधाराचा फायदा घेऊन महिलेला उसाच्या शेतात ओढले आणि…

0
357

आळंदी, दि. २३ (पीसीबी) – रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन एका व्यक्तीने महिलेला उसाच्या शेतात ओढण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केला असता ओढणारा व्यक्ती पळून गेला. त्यानंतर त्याच्या दोन साथीदारांनी महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून घडलेल्या प्रकाराची वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री मरकळ येथे घडली.

याबाबत 32 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय संतोष गोडसे (रा. मरकळ), विषाल गोडसे, संकेत (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला घरासमोर असलेल्या नळाला पाणी आले आहे का, ते पाहण्यासाठी बाहेर आली. त्यावेळी अंधारात लपून बसलेल्या आरोपी अक्षय याने महिलेला अंधाराचा फायदा घेऊन घराजवळ असलेल्या उसाच्या शेतात ओढण्याचा प्रयत्न केला. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू मला आवडतेस. माझ्यासोबत चल’, असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. दरम्यान महिलेने आरडाओरडा केला. त्यावेळी महिलेचे कुटुंबीय घराबाहेर आले. कुटुंबीयांची चाहूल लागताच आरोपी अक्षय अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर त्याचा भाऊ विशाल आणि संकेत महिलेच्या घरासमोर आले त्यांनी महिलेला आणि तिच्या घरच्यांना शिवीगाळ केली. ‘घडलेल्या घटनेची कोठेही वाच्यता करू नका, नाहीतर तुम्हाला सोडणार नाही’ असे म्हणत मारण्याची धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.