अंत्यविधी करणारे, भोजन पुरविणार्‍या स्वयंसेवकांचाही कोरोना योद्धा म्हणून गौरव व्हावा; उपमहापौर तुषार हिंगे यांची महापौर, प्रशासनाला सूचना

0
288

पिंपरी, दि.2 (पीसीबी) – कोरोना महामारीच्या संकटात जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, पोलिस यांच्या सोबतच कोरोनाबाधितांवर अंत्यविधीचे काम करणारे, कम्युनिटी किचन चालविणारे, भोजन पुरविणारे स्वयंसेवक तसेच, पालिकेच्या इतर अधिकार्‍यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात यावा, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड महापलिकेच्या सोमवारी (दि.1) झालेल्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, कोरोनाबाधित रूग्णांच्या अंत्यविधीला त्याचे नातेवाईकही उपस्थित राहत नाहीत. अशा वेळी महापालिकेचे कर्मचारी त्यांचा अंत्यविधी करतात. तसेच, गरजूंना दररोज दोन वेळेचे भोजन पुरविण्याचे काम शहरातील असंख्य स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था स्वत: कम्युनिटी किचन चालून अनेकांची भूक भागवित आहेत. गरजूंना सकस आहार पुरवित आहेत. या सर्व कोरोना योद्धांचा महापालिकेने स्मृतिचिन्ह देऊन विशेष गौरव करावा.

ते म्हणाले की, कोरोना महामारीत ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पालिका प्रशसानाने उपाययोजना राबवाव्यात. कोरोना काळात न घाबरता नियमितपणे दैनंदिन सफाईचे काम करणार्‍या घंटागाडी कामगारांना महापालिका नोकरीत कायम करावे, अशी सुचना उपमहापौर हिंगे यांनी महापौर उषा ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली.