राज्यात आतापर्यंत पुराचे १४४ बळी ; तीन दिवसात स्थिती नियंत्रणात येणार

0
394

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – महाराष्ट्रात यंदाच्या पावसात आलेल्या पुरामुळे जूनपासून आतापर्यंत १४४ जण मृत्युमुखी पडले आहेत. जून २०१९ ते आतापर्यंत सरासरीच्या एकूण १०९ टक्के पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाचा फटका कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक जिल्ह्याना बसला. हजारो गावे पुराच्या पाण्याखाली आलेत. तर लाखो लोक बेघर झाले. दोन लाखांच्या जवळपास नागिरकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेले आठवडाभर पुरामुळे हाहाकार माजला आहे. कोल्हापुरातील २३९ तर सांगलीतील ९० गावांना पुराचा फटका बसला आहे. कोल्हापुरात सरासरीच्या १२४ टक्के तर सांगलीत सरासरीच्या २२३ टक्के पाऊस पडला आहे. गेल्या सात दिवसांपासून पूर परिस्थिती असून सध्या पावसाने उसंत घेतली मात्र पुराचे पाणी ओसरण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. या दरम्यान पाऊस आल्यास पुन्हा महापूर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

कोल्हापूर व सांगलीतील अंदाजे ८५ टक्के शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुराच्या पाण्याखाली शेती आहे. राज्य सरकारने १५४ कोटी रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले आहेत. यासह श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीतर्फे १० कोटी, विविध राजकीय पक्षांकडून कोट्यवधींची मदत पुरग्रस्थांना मिळत आहे. एनडीआरएफचे जवान, लष्कर, नौदल आणि प्रशासनामार्फत बचावकार्य सुरू आहे. पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. सांगलीत पावसाचा जोर कमी झाला आहे.