कोल्हापुरातील फुटांनी वाढलेले पाणी इंचांनी होते आहे कमी

0
476

कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) – शहराला गेली नऊ दिवस पडलेला महापुराचा वेढा रविवारी कायम राहिला. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराचे पाणी संथ गतीने कमी होत आहे. महापुराचे फुटात वाढलेले पाणी इंच-इंचाने कमी होत असल्याने अजूनही शहरातील प्रमुख मार्ग बंदच आहेत. कळंबा तलावातून सायपन पध्दतीने पाणी पुरवठा होणारा परिसर वगळता शहराचा पाणी पुरवठा बंदच आहे. पाणी, पेट्रोल आणि घरगुती गॅस सिलेंडरचा कमालीचा तुटवडा आहे. पूरस्थिती कायम असल्याने शहरवासीय हतबल झाले आहेत.

मागील शनिवार (दि. ३) पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर रविवारी (दि.४) रात्री दहा वाजल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवर पाणी आले. सोमवार (दि.५)पासून कसबा बावडा जयंती नाला पूल, दसरा चौकातील शाहू पूल, लक्ष्मीपूरीतील विल्सन पूल व कोंडा ओळीतील संभाजी पूलावर पाणी आल्याने वाहतुक बंद झाली. ती आजअखेर बंद आहे. आज शहरात पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी कमी होण्यास सुरूवात झाली. मात्र, हा वेग अत्यंत संथ असल्याने या पुलावरील पाण्याचा निचरा होवून रस्ता खुला होण्यास किमान दोन दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

व्हिनस कॉर्नर चौक, शाहुपूरी, गवत मंडई, कोंडा ओळ, राजहंस प्रिंटींग प्रेस परिसर, बसंत बहार रोड, कुंभार गल्ली, जाधववाडी, बापट कॅम्प परिसर, जाधववाडी, कसबा बावडा-शिये, कसबा बावडा रेणुका मंदिर परिसर, न्यू पॅलेस परिसर, महावीर काॅलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता, लक्ष्मीपूरीचा पूर्व भाग, पंचगंगा तालीम परिसर, आदी भागात पुराचे पाणी आहे. दिवभरात सरळ रेषेत पाणी दोन ते तीन फुटांनी मागे गेले असले तरी पाण्याची उंचीमध्ये फारसा फरक जाणवत नसल्याचे स्थानिकांचे मत आहे.