गणित विधानसभेचे : पिंपरी विधानसभेत शिवसेना राबवणार भाजपचा फॉर्मूला

0
591

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : राष्ट्रवादीच्या पावलावर पाऊल टाकत भाजपदेखील उमेदवाराची ताकद पाहूनच तिकिटाचे वाटप करणार आहे. मग तो दुसऱ्या पक्षातील आयात उमेदवार का असेना ; या फॉर्म्यूल्याचा फायदा होत असल्याने पिंपरी विधानसभेसाठी शिवसेनादेखील याच फॉर्म्युल्याचा वापर करणार असल्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. तसे संकेत पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिले होते.

भाजप-शिवसेना युतीच्या वाटाघाटी सध्या शेवटच्या टप्प्यात असून लवकरच जागा निश्‍चित होणार आहेत. त्यामध्ये पिंपरी मतदारसंघ शिवसेनेकडे जाऊ शकतो. सध्या पिंपरीत शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, त्यांची कामगिरी असमाधानकारक असून त्यांच्याबाबत मतदार संघातील जनतेत नाराजीचा सुर आहे. तसेच आमदारांना आपल्या बंधुला महापालिका निवडणुकीत विजयी करता आले नाही. त्यामुळे शिवसेना स्ट्राँग उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे. एखाद्या वेळी आयात उमेदवारालाही तिकीट दिले जाऊ शकते.

पिंपरीत हवा भक्कम उमेदवार

वंचित बहुजन आघाडी हा नवीन पक्ष महाराष्ट्रात उदयाला आल्याने सर्व राजकीय समीकरणे बदलली आहेत. वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीही पिंपरीसाठी तगड्या उमेदवाराची चाचपणी करत आहे. त्यामुळे शिवसेनेकडे त्याच तोडीचा उमेदवार असणे गरजेचे आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याचे ठरवले तर पिंपरीची जागा शिवसेना व भाजप युतीच्या हातून जाईल. असा राजकीय निरिक्षकांचे म्हणणे आहे.

शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपमध्ये पिंपरी विधानसभेसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे व माजी नगरसेवक राजेश पिल्ले भाजपकडून इच्छुक आहेत. मात्र, त्यांचा पाहिजे तेवढा जनसंपर्क नाही. त्यामुळे साताऱ्यात ज्या पद्धतीने माजी आमदार नरेंद्र पाटील यांचा भाजपनेच शिवसेनेत प्रवेश करून दिला होता. त्याच पद्धतीने पिंपरीतही तीन वेळा नगरसेविका व स्थायी समितीच्या अध्यक्षा राहिलेल्या सीमा सावळे यांना शिवसेना विधानसभेसाठी गळ घालू शकते. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून सुमारे 50 झोपडपट्ट्या या मतदार संघात येतात. त्यामुळे उच्चभ्रू सोसायट्यांपासून झोपडपट्ट्यांतील शेवटच्या घटकापर्यंत पोचणाऱ्या उमेदवारालाच यावेळी जनता कौल देणार यात वाद नाही. कारण दिवसेनंदिवस जनता जागृत होत असून आपले अधिकार व लोकप्रतिनिधी, प्रशासनाचे कर्तव्य जनतेला ठाऊक आहेत.

दरम्यान, नगरसेविका सीमा सावळे यांना मतदार संघातील प्रश्नांबाबत चांगली जाण असून नुकतेच त्यांनी पिंपरी विधानसभेतील २००० महिलांना स्वयंरोजगार मिळवून दिला. त्यामुळे मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पिंपरीतून निवडणूक लढवावी. अशी सर्वसामान्यातून मागणी होत आहे. सावळे यांनीही विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू असून त्यांची अपक्षही लढण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे. सावळे यांचा मोठा जनसंपर्क व जनसामान्यांत असलेल्या प्रतिमेच्या जोरावर त्यांना मोठा जनाधार मिळू शकतो, असा त्यांचा विश्वास आहे. मात्र, त्यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.