‘हे उद्धवा अजब तुझे सरकार, असं म्हणायची वेळ आलीये का?’

0
337

मुंबई, दि.२३ (पीसीबी) : ३ पक्ष एकत्र येऊन गेल्या सव्वा वर्षांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं … ३ पक्ष एकत्र आल्याने सामान्य नागरिकांच्या देखील अपेक्षा वाढल्या .. सरकार स्थापन होत नाही तोच राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला … कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने जे परिश्रम घेतले ते नक्कीच कौतुकास्पद आहेत …त्यांच्याच मंत्रिमंडळातील राज्याचे वनमंत्री व शिवसेनेचे नेते संजय राठोड मात्र पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहे.. . पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप भाजपकडून आला , त्यांनतर त्या संबंधीच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मीडिया वर व्हायरल झाल्या … काल देखील संजय राठोड आणि पूजा चव्हाण यांचे फोटो व्हायरल झाले … एकीकडे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मात्र याबाबत अद्याप संयमी भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून तथ्य आढळल्यास कारवाई करु, असे स्पष्ट संकेत दिले असले तरी अजूनही मंत्री राठोड यांच्याबाबत बोलणं त्यांनी टाळलं आहे. आज तर चक्क शिवसेना नेते संजय राठोड सपत्नीक पोहरादेवी मंदिरात दर्शनाला गेले …संजय राठोड यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी गडावर जोरदार बॅनरबाजी करण्यात आली होती … अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापासून अनेक ठिकाणी संजय राठोड यांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले.. मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी पोलिसांकडून या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला … पोहरादेवीला जाण्यासाठी निघालेल्या संजय राठोड यांच्या घरी सकाळपासून शिवसेनेचा एकएक नेता दाखल होत होता …. त्यामुळे आता बंजारा समाजापाठोपाठ शिवसेना पक्षही संजय राठोड यांच्या पाठिशी उभा असल्याचे दिसून आला.

एकंदरीत हे सगळं चित्र पाहता या प्रकरणात मुख्यमंत्री सबुरीने निर्णय घेत असल्याचं म्हटलं जात आहे… या प्रकरणात शिवसेना नेत्यांना याबाबत प्रतिक्रिया न देण्याच्या सूचनाही मातोश्रीवरुन करण्यात आल्या असल्याच बोललं जातंय ….मग संजय राठोड यांच्या विरोधात एवढे सगळे पुरावे असताना मुख्यमंत्री महोदय शांत का असा प्रश्न आहे ?संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडले असल्याने पक्षांतर्गत कलह नको म्हणून मुख्यमंत्री गप्प आहेत का ?असा सवाल देखील उपस्थित होतोय … काही दिवसांपूर्वी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही असेच आरोप करण्यात आले होते. त्यावेळी भाजपनं धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांची बाजू सावरत संपूर्ण चौकशी झाल्यावरच निर्णय घेऊ, अशी भूमिका घेतली होती. शरद पवार यांनीही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं तातडीने निर्णय न घेता विचार करुनच निर्णय घेण्यात येईल, असं म्हटलं होतं. पण तपासाअंती त्यात काही तथ्य आढळलेलं नव्हतं … कौटुंबिक कलहातून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले असं समोर आलं आणि त्या प्रकरणावर देखील पडदा टाकण्यात आला …या दोन्ही प्रकरणात आक्रमक झालेला विरोधी पक्ष देखील सध्या थंडावला आहे … गृहमंत्र्यांनी संजय राठोड यांची चौकशी करू असं म्हटलं होत मात्र अद्यापही या मंत्रिमहोदयांची चौकशी नाही … इकडे मंत्री महोदय कुटुंबासह देवदर्शनाला जाऊन शक्तिप्रदर्शन करतायेत ,बॅनर बाजी करतायेत … हाच मुख्यमंत्र्यांचा न्याय्य कारभार म्हणावा का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय … त्यात संजय राठोड यांनी पोहरादेवी दर्शनांनंतर पत्रकार परिषद घेत चक्क मीडियासमोरच हाथ जोडले माझ्या राजकीय जीवनाला उध्वस्त करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचं बोलत आरोप फेटाळून लावले …

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून सर्वसामान्य जनतेला अपेक्षा असतात … पण गेल्या काही दिवसांपासून या राजकारणान्यांची हि असली थेरं पाहता सर्वसामान्य घरातील पालक आपल्या मुलींना राजकारणाकडे वळू देतील का असा देखील प्रश्न आहे …हे असले प्रकार राजकीय क्षेत्रात वारंवार होणार असतील तर तिथे देखील ‘मी टू'(#MeToo 2005) चळवळ सुरु होते कि काय असं वाटायला लागलाय …या असल्या लांडग्यांना जर मुख्यमंत्री महोदय तुम्ही पाठीशी घालणार असाल तर तुमच्यावर जनतेची असणारी विश्वासहर्ता कमी होईल .. मंत्री महोदयांना पाठीशी घालण्याचा पायंडा जर पडला तर हि शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही असा समज सर्वसामान्यांचा होईल … मुख्यमंत्री महोदय तुम्ही कुटुंबवत्सल , मितभाषी आणि सुसंकृत राजकारणी आहात .. या प्रकरणावर शांत बसणं हे शिवसेनेच्या संस्कृतीत बसत नाही … असंगाशी संग ,मृत्युशी गाठ… असते हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवं .. नाहीतर खरोखरच ‘उद्धवा अजब तुझे सरकार’ म्हणायची वेळ येईल …