शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण देणारे ‘ते’ दोन मुख्य आरोपी अखेर दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

0
294

नवी दिल्ली, दि.२३ (पीसीबी) : मागील महिन्यात २६ जानेवारीला दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २ मुख्य आरोपींना अटक केली आहे. मोहिंदर सिंग (वय ४५) आणि मनदीप सिंग (वय ३०) या दोघांचा समावेश आहे. या दोघांनासुद्धा जम्मूमधून अटक करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलकांमध्ये या दोघांचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून करण्यात येत आहे. यापूर्वी देखील दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून गायक कलाकार दीप सिद्धू याला अटक केली आहे.

मोहिंदर सिंग हे जम्मूच्या सातबारी भागातले रहिवासी असून ते काश्मीर युनायटेड फ्रंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आहेत. लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कटाचे मुख्य सूत्रधार म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नीने मात्र या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘त्यांना एसएसपी साहेबांनी बोलावलं होतं. जर त्यांना भिती वाटली असती, तर त्यांनी १० लोकांना सोबत नेलं असतं. पण त्यांना वाटलं नियमिच चौकशी आहे. पण जेव्हा ते परत आले नाहीत आणि त्यांचा फोन देखील बंद लागला, तेव्हा मी एका मुलाला तपासण्यासाठी पाठवलं. तेव्हा समजलं की त्यांना अटक करण्यात आली आहे’, अशी तक्रार त्यांच्या पत्नीने केली.

तर दुसरा आरोपी मनदीप सिंग हा गोले गुजरालचा रहिवाशी असून त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याच्या एका घुमटावर चढल्याचा आरोप असलेल्या जसप्रित सिंगला अटक केली आहे. त्यासोबतच, हातात तलवारी फिरवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या मनिंदर सिंगला देखील अटक करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये चालू असलेल्या आंदोलनाला २६ जानेवारीला हिंसक वळण मिळाले होते.