कोरोना रुग्णांचे रिपोर्ट खासगी रुग्णालयांच्या हातात, मोठी साखळी असल्याचा नगरसेवकांचा आरोप

0
379

पिंपरी, दि. 29 (पीसीबी): नगरसेविकेच्या पतीने महापालिकेच्या रुग्णालयात कोरोनाची तपासणी केली. मात्र त्यांना निगडीतील एका खासगी रुग्णालयातून फोन आला. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे सांगत खासगी रुग्णालयात उपचारासाठी बोलविले. नगरसेविकेच्या पतीने याबाबत महापालिकेच्या डॉक्‍टरांकडे विचारणा केली असता तुमचा रिपोर्ट अद्याप आलेला नसल्याचे सांगितले. त्यानंतर सायंकाळी महापालिकेकडून आलेला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले.

महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी केल्यावर रुग्णांचे मोबाइल क्रमांक खासगी रुग्णालयात जातातच कसे, असा सवाल भाजप नगरसेविका कमल घोलप आणि नगरसेवक उत्तम केंदळे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी पोलीस आयुक्‍तांकडे केली आहे.
भाजप नगरसेविका कमल घोलप यांचे कुटुंबीय यापूर्वी कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यांनी घरीच उपचार घेतले. दोन दिवसांपूर्वी कमल घोलप यांच्या पती आणि त्याचे तीन डॉक्‍टर मित्रांनी महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात कोरोनाची चाचणीकरिता पुन्हा स्वॅब दिले. त्याचा अहवाल येणे बाकी होते. दरम्यानच्या काळात निगडीतील एका नामांकित खासगी रुग्णालयाकडून घोलप यांना फोन आला. त्यात तुमचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. तसेच खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती होण्यास सांगितले. याबाबत घोलप यांनी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्‍टरांकडे विचारणा केली. मात्र तुमचा अहवाल अद्याप आलेला नसल्याचे सांगितले. मग निगडीतील खासगी रुग्णालयाकडे चाचणी करुन घेणाऱ्यांचे मोबाइल नंबर कसे पोहोचले याबाबत विचारणा करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी घोलप आणि त्यांच्या तीन मित्रांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. मग खासगी रुग्णालयाने त्यांना पॉझिटिव्ह असल्याचे कसे सांगितले ? तसेच तपासणी केलेल्या रुग्णांचे मोबाइल क्रमांक खासगी रुग्णालयाकडे कसे गेले, असा सवाल घोलप यांनी उपस्थित केला आहे. कोरोना चाचणी करणारे आणि खासगी रुग्णालयाचे एक रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप नगरसेविका घोलप यांनी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी नगरसेविका कमल घोलप आणि प्रा. उत्तम केंदळे यांनी अपर पोलीस आयुक्‍त रामनाथ पोकळे यांची भेट घेऊन त्यांना चौकशी करण्यासाठी निवेदनही दिले आहे.

कोरोनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. आपले कुटुंबीय पॉझिटिव्ह आले होते. २२ दिवसानंतर महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी केली असता खासगी रुग्णालयाकडून पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचे सांगितल्यामुळे पतीला मानसिक धक्‍का बसला असून पुन्हा ते आजारी पडले आहेत. रुग्णांची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करून हे रॅकेट उद्धवस्त केले पाहिजे.
– कमल घोलप, भाजप नगरसेविका 
—–‘
अशी घटना लोकप्रतिनिधीच्या बाबतीत घडली म्हणून उघडकीस येत आहे. परंतु शहरातील सामान्य नागरिकांवर असे अनेक प्रसंग आले असणार आहेत. त्यामुळे कोरोना विषयी ऍडमिट करण्यासाठी फोन आले असल्यास संपर्क साधावा आणि याबाबतीत शहरातील नागरिकांनी सावध रहावे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
– उत्तम केंदळे, भाजप नगरसेवक