पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक

0
502

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – सलग दोन वर्षे नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईबाबत केंद्रीय गृहविभागाकडून मिळाले पदक; पिंपरी चिंचवड पोलीस दलाकडून कौतुकसलग दोन वर्षे नक्षलवादयांविरुध्द अती दुर्गम भागात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल केद्रिय गृह विभागाकडून 2015 मध्ये जाहीर झालेले ‘आंतरिक सुरक्षा सेवा पदक’ प्रदान करण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन अधिका-यांचा समावेश होता. शहरात पोलीस दलातील अधिका-यांच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

बुधवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या प्रागंणात हा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. आंतरिक सुरक्षा सेवा पदक मिळालेल्या पोलीस अधिका-यांमध्ये चिंचवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित मधुकर जाधव, वाकड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शंकर भोगम, भोसरी वाहतूक विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण अश्रुबा मिसाळ आदींचा समावेश आहे.

सर्व पदक विजेते अधिकारी हे सन 2010 ची महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उप-निरीक्षक पदाची परीक्षा पास होवुन महाराष्ट्र पोलीस दलात रुजु झाले आहेत. त्यांनी ऑक्टोबर 2011 ते ऑगष्ट 2014 अशी सलग दोन वर्षे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, मुलचरा व चामोर्शि या नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांविरोधात उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

या कामगिरीची दखल केंद्रीय गृह विभागाने घेत 2015 साली त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले. पदक विजेत्या अधिका-यांचे कौतुक करताना पोलीस आयुक्त म्हणाले, यापुढेही आपण सर्व जण अशीच उत्तम कामगीरी करुन पोलीस दलाचे नाव उंचवावे. पोलीस दलात उत्कृष्ट कार्य करुन पुढे जावुन राष्ट्रपती पदक मिळवण्याचा प्रयत्न करावा.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राखीव पोलीस निरीक्षक राजकुमार माने यांनी केले.