लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला, पण मॉल्स व जिम्स ५ ऑगस्टपासून सुरू

0
229

मुंबई, दि. ३० (पीसीबी) : केंद्र सरकारने अनलॉक- 3 च्या गाईडलाईन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

नव्या गाईडलाईनमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेदरम्यान मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पेक्स सुरु राहणार आहेत. मॉल्समधील थिएटर मात्र सुरू होणार नाहीत. फूड मॉलमधील हॉटेल्स फक्त घरपोच जेवण देऊ शकतील.

आऊटडोअर खेळ ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज, व्यायामशाळा , टेनिस, बॅडमिंटन आणि मल्लखंब यांना 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्वीमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी नाही. तसेच आता दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये 1+3, रिक्षामध्ये 1+2, चारचाकीमध्ये 1+3 परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रवाशांना मास्क अनिवार्य आहे.