संकटाच्या मागे हात धुवून लागायच – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

0
539

 

मुंबई, दि.२८ (पीसीबी) – राज्यात कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या दरम्यान शासकीय पातळीवर रोज बैठका आणि निर्णय सुरु आहेत. सरकारकडून एकीकडे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत असतानाच दुसरीकडे त्यांची गैरसोय टाळायची अशी कसरत सुरु आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शुक्रवार २७ मार्च रात्रीही त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आहे.

आज बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकाने २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय धाडसी असल्याचं सांगत जनतेला दुकानांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण करोनाच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण पोहोचलो असल्याचे सांगितले. २४ तासं दुकाने सुरु ठेवणे हा आपल्या सरकारचा धाडसी निर्णय आहे. तुमच्या सर्वांच्या विश्वासावर हा निर्णय घेतला आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही आहे अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरेंनी सांगितले की, “संकटाच्या मागे हात धुवून लागायचे आहे. जीवनाश्यक वस्तूंची दुकान २४ तास सुरु राहणार आहेत हे वारंवार सांगत आहोत. काही ठिकाणी काहीही कारण नसताना झुंबड उडाल्याचे कळाले. आम्ही गर्दी करु नका असे आवाहन वारंवार करत आहोत”. “भाज्यांची वाहतूक सुरु आहे. लक्षात येत आहे त्याप्रमाणे सूचना देत आहोत. शेतीविषयक मजुरांची ये जा थांबता कामा नये. अन्नधान्य पुरवठा करणारी मालवाहतूक थांबवता येणार नाही. ती चालू आहे,” असे उद्दव ठाकरेंनी सांगितले.

पण एका गोष्टीमुळे आपल्याला धक्का बसला. जिल्ह्यातील किंवा इतर राज्यातील माणसं ज्या पद्धतीने प्रवास करत आहेत ते पाहून आपल्याला धक्का बसला. लोक दुधाच्या टँकरमधून प्रवास करत असल्याचा प्रकार भयानक आहे. हे होता कामा नये असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. “काही राज्यांचे मुख्यमंत्री मला फोन करत आहेत. हे एक संकट आहे. जिथे आहात तिथेच थांबा असं आवाहन मी करत आहे. परराज्यातील कामगारांची जबाबदारीही राज्य सरकार घेत आहेत. काही संस्थांनाही आम्ही आवाहन करत आहोत. त्या संस्था पुढे येऊन जर त्यांची जबाबदारी घेणार असतील तर सरकारला फार मोठी मदत होईल,” असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात जे इतर राज्यातील कामगार आहेत तिथेच थांबावे ही महाराष्ट्र सरकारची सूचना आहे. याशिवाय महाराष्ट्रातील जे इतर कामगार असतील त्यांची माहिती आपल्याकडे आहे. त्यांची व्यवस्था तिथे केली जात आहे. माणुसकी जपली पाहिजे. त्याचीच सध्या मदत होत आहे,” असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. “मला शिर्डी साईमंदिर, सिद्धिविनायक आणि इतर संस्था ज्यांनी मदत केली आहे त्यांचे आभार मानतो. आपण करोना व्हायरसच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. आपण कल्पना करु शकत नाही इतक्या झपाट्याने तो पसरतो. आपल्याकडे रुग्ण वाढत असताना जी लोकं रुग्णालयात वेळेत दाखल झाली त्यापैकी काहीजण बरे होऊन घरी परतले आहेत ही दिलासा देणारी बातमी आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.