पुणे ग्रँड टूर पर्व २: जिल्ह्यात ९०० कोटींमधून ६६२ किमी रस्त्यांचे होणार नूतनीकरण!

bpcauthor
1 Min Read

पुणे ग्रँड टूरच्या दुसऱ्या पर्वासाठी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ₹९०० कोटी खर्च करून ६६२ किलोमीटर रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. रस्त्यांची कामे १ सप्टेंबरपासून सुरू करून ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

पहिल्या पर्वात जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ४३७ किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात आली होती. आता दुसऱ्या पर्वात ११ तालुक्यांतील आणखी ६६२ किलोमीटर रस्त्यांचा विकास केला जाणार आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुमारे ₹३६५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कामांची गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. साहित्याचा दर्जा, रस्त्यांची जाडी, डांबरीकरण तसेच आवश्यक सुरक्षा उपायांची नियमित तपासणी केली जाणार आहे.

रस्त्यांच्या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव खपवून घेतला जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कंत्राटदारांची निवड नियमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निकृष्ट दर्जाचे काम किंवा वारंवार सूचना देऊनही सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Share This Article