पुण्यातील येरवडा परिसरात दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सविता सुरेश हरिभक्त (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी तिच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी मुलाने आईकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने घरातील सुरीने आईवर सपासप वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच येरवडा आणि विश्रांतवाडी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून फॉरेन्सिक पथकाकडूनही तपासणी केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

