दुर्घटनेच्या सखोल व निष्पक्ष चौकशीसह दोषी व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी; न्यायालयात फौजदारी तक्रार अर्ज सादर
पिंपरी : मोशी येथील कचरा डेपो परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेतील मृत कामगारांना न्याय मिळावा, घटनेमागील नेमकी कारणे शोधून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य संदीप बाळकृष्ण वाघेरे यांनी आता न्यायालयीन लढा सुरू केला आहे.
या प्रकरणात प्रशासन व पोलीस यंत्रणेकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याची भूमिका घेत वाघेरे यांनी पिंपरी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात फौजदारी तक्रार अर्ज सादर केला आहे.
दि. ८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपो परिसरात ही दुर्घटना घडली होती. कचऱ्याचा मोठा ढिगारा वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने नऊ कंत्राटी कामगारांना आपला जीव गमवावा लागला, तर १४ कामगारांची सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर १३ जुलै रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुर्घटनेच्या अनुषंगाने महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मात्र, केवळ प्राथमिक कारवाई करून हा विषय संपुष्टात येऊ नये, तर दुर्घटनेची सर्वंकष चौकशी होऊन प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांची भूमिका तपासली जावी, अशी मागणी वाघेरे यांनी केली आहे. प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्था, कचरा व्यवस्थापनाची कार्यपद्धती, तांत्रिक बाबी, प्रशासकीय देखरेख तसेच संबंधित यंत्रणांनी पार पाडलेल्या जबाबदाऱ्यांची सखोल तपासणी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
या दुर्घटनेबाबत वाघेरे यांनी यापूर्वी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडे तक्रार अर्ज व निवेदने सादर करून पाठपुरावा केला होता. मात्र, प्रकरणातील सर्व संबंधितांची जबाबदारी निश्चित होऊन ठोस कायदेशीर कार्यवाही व्हावी, या उद्देशाने त्यांनी न्यायालयाचा मार्ग स्वीकारला आहे.
निष्पाप कामगारांच्या मृत्यूची जबाबदारी निश्चित होणे, दुर्घटनेमागील सत्य जनतेसमोर येणे आणि भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना होणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा न्यायालयीन व प्रशासकीय स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची भूमिका नगरसेवक संदीप वाघेरे यांनी घेतली आहे.
आता या न्यायालयीन तक्रारीवर पुढे कोणती कार्यवाही होते आणि दुर्घटनेतील जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने तपासाला कोणती दिशा मिळते, याकडे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

