चिंचवड, कोथरूड, ठाणे, डोंबिवलीसह ३० मतदारसंघावर ब्राम्हण समाजाचा दावा

bpcauthor bpcauthor
4 Min Read

– चिंचवडसाठी विशेष आग्रही, महाराष्ट्र ब्राम्हण सभेची चंद्रशेख बावनकुळे यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – चिंचवड, कोथरूड, कसबा, ठाणे, कल्याण-डोंबिवली सह राज्यातील ब्राम्हण बहुल अशा ३० विधानसभा मतदारसंघातून ब्राम्हण समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी ब्राम्हण महासभेने केली आहे. महाराष्ट्र ब्राह्मण सभा अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्या संदर्भात पत्र पाठविले आहे. दरम्यान, चिंचवड विधानसभै मतदारसंघात बहुजन समाजातील इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरी होऊन मतविभागणीचा धोक असल्याने इथे प्राधान्याने विचार करण्याची मागणी केली आहे.

आपल्या पत्रात डॉ. बोधनी म्हणतात, ब्राह्मण समाजाने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला नेहमीच संपूर्ण पाठिंबा दिला आहे आणि आम्ही आपल्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवतो. मात्र, सध्या राज्यातील ब्राह्मण समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेसाठी किमान 30 जागा ब्राह्मण समाजाला देण्याची आमची मागणी आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड बाबत ब्राम्हण समाज विशेष आग्रही असल्याचे डॉ.बोधनी यांनी नमूद केले आहे. पत्रात ते म्हणतात, विशेषतः चिंचवड विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची मतदारसंख्या निर्णायक असून, या मतदारसंघातून भाजपकडून ब्राह्मण उमेदवार दिला जावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. चिंचवडसारख्या मतदारसंघात बहुजन समाजातील इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे कोणालाही उमेदवारी दिली तरी बंडखोरी अटळ आहे. त्यामुळे मतांची विभागणी होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर ब्राह्मण उमेदवाराला संधी दिल्यास, या मतदारसंघात विजय मिळवणे सहज शक्य होईल. महाराष्ट्रीयन ब्राम्हण तसेच बहुभाषक ब्राह्मण मिळून चिंचवडमध्ये ८० हजारांहून अधिक मतदार आहेत. ब्राम्हण समाज नेहमीच विचारपूर्वक मतदान करतो, त्यामुळे त्यांच्या मतांचा योग्य वापर झाला पाहिजे. भाजपकडे ब्राह्मण समाजाची एकगठ्ठा मते आहेत, विशेषत: चिंचवड मतदारसंघात. ब्राम्हण समाजाने नेहमीच कर्तव्य म्हणून मतदान केले आहे, मात्र यावेळी भाजपने नेतृत्वाची संधी देऊन ब्राह्मण उमेदवाराला उभे करावे, अशी आमची विनंती आहे.

ब्राम्हण मतदार ४५ ठिकाणी निर्णायकी –
राज्यातील ४५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. त्यापैकी किमान ३० जागांवर ब्राह्मण उमेदवारांना संधी मिळावी, अशी आमची मागणी आहे. पुण्यातील कोथरूड, कसबा तसेच पिंपरी-चिंचवड, ठाणे, कल्याण-डोंबिवली या मतदारसंघांमध्ये ब्राह्मण उमेदवार निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार उपलब्ध आहेत. योग्य वेळी आम्ही त्यांची नावे सादर करू. गेल्या काही वर्षांत राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले आहेत, ज्यात ब्राह्मण समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात आले आहे. या परिस्थितीत ब्राह्मण समाजाला राजकीय भूमिका घेणे अनिवार्य झाले आहे, त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत, असे डॉ.बोधनी यांनी पत्रात स्पष्ट केले.

भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये –
राज्यभरातील विविध समाजांनी संघटित होऊन राजकीय जागरूकता दाखवली आहे. ब्राह्मण समाजही आता जागरूक होऊन संघटित होत आहे. शिक्षण, नोकरी यासारख्या क्षेत्रात आरक्षण नसतानाही ब्राह्मण समाज आपल्या कष्ट, बुद्धिमत्ता, व गुणवत्तेच्या जोरावर टिकून आहे. म्हणून भाजपने ब्राह्मण समाजाला गृहीत धरू नये. राज्यभरात अनेक मतदारसंघांमध्ये सक्षम ब्राह्मण नेते आहेत, मात्र त्यांना पुढे येण्याची संधी मिळत नाही. संधी मिळाल्यावर त्यांनी नेहमीच त्यांचे नेतृत्व सिद्ध केलेले आहे. म्हणून, योग्य उमेदवारांना संधी दिल्यास ब्राह्मण समाजही यशस्वी नेतृत्व देऊ शकेल, अशी ग्वाही बोधन यांनी दिली आहे.

…तर भूमिकेचा पुनर्विचारावी लागेल –
ब्राह्मण समाजाने आतापर्यंत संघर्ष नको म्हणून बरेच त्याग केले आहेत, पण आता समाजाला संघर्ष करण्याची गरज आहे, आणि यासाठी पक्षाने ब्राह्मण उमेदवारांना संधी देऊन त्यांचा योग्य सन्मान करावा. ब्राह्मण समाजाने हिंदुत्वाच्या समर्थनार्थ कायम उभे राहून भाजपला पाठिंबा दिला आहे, आणि भविष्यातही तो पाठिंबा कायम राहील. मात्र, या वेळी उमेदवारी न मिळाल्यास समाजाला आपली भूमिका पुनर्विचारावी लागेल, असा गंभीर इशाराही या पत्रातून दिलेला आहे.

Share This Article